IPL 2026 Royal Challengers Bengaluru Won By 43 Runs Against Chennai Super Kings टीम डेविडच्या धमाकेदार खेळीनंतर भुवीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ४३ धावांनी दिमाखदार विजय नोंदवला. दुसऱ्या बाजूला या सामन्यातील पराभवासह चेन्नई सुपर किंग्सच्या संघावर पराभवाच्या हॅटट्रिकची नामुष्की ओढावली. पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने २५० धावा करत चेन्नई सुपर किंग्ससमोर २५१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ २०७ धावांवर ऑल आउट झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेरच्या षटकात टीम डेविड-रजत पाटीदारची वादळी खेळी
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या रुपात अवघ्या ३७ धावांवर त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिला धक्का दिला. तो १८ चेंडूत २८ धावा करून स्वस्तात माघारी फिरला. पण त्यानंतर प्रत्येकाने उपयुक्त धावा करत संघाचा धावफलक हलता ठेवला. फिल सॉल्टनं ३० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. देवदत पडिक्कल याने २९ चेंडूत अर्धशतक झळकावले. कर्णधार रजत पाटीदार याने १९ चेंडूत २ चौकार ६ षटकाराच्या मदतीने नाबाद ४८ धावा आणि टीम डेविड याने २५ चेंडूत ३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने केलेल्या ७० धावांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २५० धावा केल्या होत्या. चेन्नईकडून गोलंदाजीत अंशुल कंबोज, जेमी ओव्हर्टन आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
सरफराज खानचं अर्धशतक, जेमी ओव्हरटनसह प्रशांत वीरची फटकेबाजी, पण...
विक्रमी २५१ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन ९ (५), कर्णधार ऋतुराज गायकवाड ७ (३) आणि आयुष म्हात्रे १ (३) हे चेन्नईच्या आघाडी फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. सरफराज खान याने २५ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. पण तो शेवटपर्यंत टिकला नाही. प्रशांत वीरनं २९ चेंडूत ४३ धावांच्या खेळीसह लक्षवेधून घेणारी खेळी केली. पण ती संघाला विजय मिळवून देण्याइतकी भारी ठरली नाही. याशिवाय जेमी ओव्हर्टन याने १६ चेंडूत केलेल्या ३७ धावांच्या जोरावर चेन्नईच्या संघाने २०७ धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीच्या गोलंदाजांनी फलंदाजीप्रमाणेच दमदार कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारनं घेतलेल्या सर्वाधिक ३ विकेट्सशिवाय जेकब डफी, अभिनंदन सिंग, क्रुणाल पांड्या यांनी प्रत्येकी २-२ तर सूयश शर्मानं एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.