IPL 2026 RCB vs CSK Anshul Kamboj bowled Tim David Showed Aggression But It Turned Out To Be A No Ball : बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला एका नो बॉलची मोठी किंमत मोजावी लागली. १८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अंशुल कंबोज याने आक्रमक फलंदाजी करण्याच्या मूडमध्ये असलेल्या टीम डेविड याला परफेक्ट यॉर्करव बोल्ड केले. पण ओव्हर स्टेप नो बॉलमुळे त्याला जीवनदान मिळाले अन् तो पेटून उठला. फ्री हिटवर षटकार मारल्यावर या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने एक धाव काढत १९ व्या षटकात स्ट्राइक आपल्याकडे घेतले. उर्वरित १२ चेंडूत अधिकाधिक स्ट्राईक रेटवर राहून या पठ्ठ्यानं चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. नो बॉलमुळे मिळालेल्या संधीचं सोन करताना टीम डेविडनं नाबाद ७० धावांची खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या धावफलकावर २५० धावा लावल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बोल्ड झाला तो नो बॉल पडला! मग टीम डेविडनं ५ षटकारांसह कुटल्या ४२ धावा अन्...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावातील १५ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर देवदत्त पडीक्कलच्या रुपात १५३ धावांवर तिसरी विकेट पडल्यावर टीम डेविड मैदानात उतरला. १८ व्या षटकात अंशुल कंबोज याने त्याला बोल्ड केले त्यावेळी तो १५ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २८ धावांवर खेळत होता. पण नो बॉलमुळे त्याला संधी मिळाल्यावर आपल्या डावात आणखी पाच षटकारांची भर घालत या पठ्ठ्यानं आरसीबीच्या संघाकडून नाबाद ७० धावांची सर्वोच्च खेळी केली.
एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात टीम डेविडनं ३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने फक्त २५ चेंडूत ७० धावांची नाबाद खेळी केली. यातील ४२ धावा या त्याने अखेरच्या १० चेंडूत काढल्या. ८ षटकारांसह त्याने आयपीएलमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या एबी डिविलियर्सची बरोबरी केली. २०१४ मध्ये एबी डिविलियर्सनं सनरायझर्स हैदराबादच्या संघाविरुद्ध ८ षटकार मारले होते. या यादीत युवराज सिंग अव्वलस्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २०१४ च्या हंगामात युवीनं दिल्लीच्या संघाविरुद्ध ९ षटकार मारले होते.