रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा तडाखेबाज युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा सर्वांना थक्क केले. सलामीवीर म्हणून मैदानात आलेल्या वैभवने अवघ्या २६ चेंडूत ७८ धावांची वादळी खेळी करून राजस्थानच्या विजयाच्या पाया रचला. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात वैभवने आपला इम्पॅक्ट दाखवला आहे. विशेष म्हणजे, राजस्थानने हे सर्व सामने जिंकले आहेत.
आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी नावाच्या ताऱ्याचा उदय झाला आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि निडर वृत्तीने त्याने बलाढ्य संघांच्या गोलंदाजांची झोप उडवली आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर अनेक फलंदाज नांगी टाकतात. मात्र, वैभवने तिथेही आपला दरारा निर्माण केला. त्याने अवघ्या १५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एकूण १७ चेंडूंत ५२ धावांची आतिशबाजी केली. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने (१८ चेंडूत ३१ धावा) लहान पण महत्त्वपूर्ण खेळी केली. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही त्याने अवघ्या १४ चेंडूंत ३९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात वैभवने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम खेळींपैकी एक साकारली.
आयर्लंडविरुद्ध संधी मिळण्याची शक्यता
भारत आणि आयर्लंड यांच्यात २६ जूनपासून दोन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. आयर्लंडविरुद्धच्या या दोन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीची निवड झाल्यास, तो भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र ठरू शकतो. वैभव सूर्यवंशी १५ वर्षांचा झाला असून आयसीसीच्या नियमांनुसार, खेळाच्या कोणत्याही प्रकारात भारतीय क्रिकेट संघासाठी निवडला जाण्यास तो आता पात्र ठरला आहे.
वैभव सूर्यवंशी कोण आहे?
वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला. वैभव सूर्यवंशी हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावाचा रहिवासी आहे. तो डावखुरा फलंदाज असून, डावखुरी फिरकी गोलंदाजीही करतो. वैभव सूर्यवंशी बिहार राज्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. २०२४ मध्ये, वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी, त्याने रणजी करंडक स्पर्धेत बिहारकडून प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी हे स्वतः देखील एक क्रिकेटपटू आहेत.
Web Summary : Young Vaibhav Suryavanshi shines in IPL 2026, impressing with explosive batting. After CSK and MI, he stunned RCB with a quickfire 78 off 26 balls. An Ireland debut beckons for the 15-year-old.
Web Summary : युवा वैभव सूर्यवंशी आईपीएल 2026 में अपनी विस्फोटक बल्लेबाजी से सबको प्रभावित कर रहे हैं। सीएसके और एमआई के बाद, उन्होंने 26 गेंदों में 78 रन बनाकर आरसीबी को चौंका दिया। 15 वर्षीय खिलाड़ी को आयरलैंड में पदार्पण का मौका मिल सकता है।