मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. गेल्या काही दिवसांत त्याने १० किलोपेक्षा जास्त वजन कमी केल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यातही त्याने वादळी अर्धशतक झळकावून केकेआरच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्याने अवघ्या ३८ चेंडूत ७८ धावा केल्या. यानंतर रोहित शर्माचा सराव सत्रादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यात त्याने जबरदस्त झेल घेतला आहे.
मुंबईला उद्या त्यांचा दुसरा सामना दिल्लीविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्याआधी रोहित शर्मा मैदानात घाम गाळताना दिसला. त्याने सरावादरम्यान एक अप्रतिम एकहाती झेल घेतला. मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहितने डावीकडे झेप घेतली आणि एका हाताने चेंडू पकडला. यानंतर रोहितच्या फिटनेसबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
रोहित शर्माचा मैदानात कसून सराव
आयपीएलच्या मागच्या हंगामात रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी इम्पॅक्ट प्लेअरची भूमिका बजावली. त्याला क्षेत्ररक्षणाची फार कमी संधी मिळाली. मात्र, या हंगामातील पहिल्या सामन्यात तो क्षेत्ररक्षण करताना दिसला. आगामी सामन्यांमध्येही रोहितला क्षेत्ररक्षणाची संधी मिळू शकते. म्हणूनच तो मैदानात कसून सराव करताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, रोहित शर्मा सध्या ३८ वर्षांचा आहे. मात्र, तरीही त्याची तंदुरूस्त खेळाडूंमध्ये गणना केली जाते.
मुंबई आणि दिल्ली यांच्यात लढत
मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. हे दोन्ही संघ शनिवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आमनेसामने येतील. हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. मुंबई आणि दिल्ली दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. दिल्लीने आपल्या पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला, तर मुंबईने केकेआरविरुद्ध विजय मिळवला.