आयपीएल २०२६ मधील सातव्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येत आहेत. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे मागील सामन्यात बाहेर राहिलेला थाला म्हणजेच महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा सरावासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्याच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईच्या संघाचा पराभव झाला. मात्र, पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या ट्रेनिंग सेशनमध्ये धोनीने सहभाग घेतला. यावेळी त्याने फलंदाजीचा सराव करताना काही उत्तुंग फटके मारले. विशेष म्हणजे, त्याने फलंदाजीचा सराव केला असला तरी यष्टीरक्षणाचा सराव टाळला, ज्यामुळे त्याच्या पूर्ण तंदुरुस्तीबाबत अद्याप साशंकता आहे.
किमान दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला
चेन्नई सुपर किंग्सने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या निवेदनानुसार, धोनी पोटरीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. वैद्यकीय पथकाने त्याला किमान दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला होता. धोनी सरावात परतला असला तरी, तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे समजते.
चेन्नईचा संघ विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी उत्सुक
धोनी सराव सत्रात दिसल्याने चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. धोनीच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसेल. जरी धोनी आजच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला, तरी त्याचे सरावात परतणे हे तो लवकरच मैदानात पुनरागमन करणार असल्याचे संकेत देत आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा संघ विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी उत्सुक आहे.