जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अशक्य गोष्टीही शक्य करता येतात, हे नजफगडच्या गल्ल्यांमध्ये टेनिस बॉलने क्रिकेट खेळणारा प्रिन्स यादवने सिद्ध करून दाखवले आहे. प्रिन्स यादव हा आज आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत असून भल्याभल्या फलंदाजांची झोप उडवत आहे. विशेष म्हणजे, ज्या तरुणाने वयाच्या १८ वर्षांपर्यंत लेदर बॉल पाहिला नव्हता, आज तोच आपल्या स्विंग बॉलिंगने अनुभवी खेळाडूंना चकवत आहे.
प्रिन्सचे वडील राम निवास यादव हे रेल्वे सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. एका सामान्य कुटुंबातील वडिलांप्रमाणेच त्यांनाही मुलाच्या भविष्याची काळजी होती. प्रिन्स फक्त स्थानिक टेनिस बॉल स्पर्धांमध्ये खेळायचा. वडिलांनी त्याला दिल्ली पोलीस शिपाई भरतीची परीक्षा देण्यास भाग पाडले. प्रिन्स शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाला. मात्र, लेखी परीक्षेत तो नापास झाला. यानंतर प्रिन्सने आपल्या वडिलांना त्याच्या भविष्याची काळजी करणे सोडण्यास सांगितले आणि तो स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवेन, असे अश्वासन दिले. आज प्रिन्स हा आयपीएलसारख्या मोठ्या लीगमध्ये एका संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
प्रिन्स यादवच्या संघर्षाची कहाणी
प्रिन्सचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आपल्या शरीराचा वरचा भाग मजबूत करण्यासाठी तो चक्क पाठीवर वाळूचे पोते बांधून भातशेतांमधून धावण्याचा सराव करत असे. हीच मेहनत आज त्याच्या वेगवान आणि भेदक गोलंदाजीत दिसून येत आहे. राम निवास यादव यांच्या मते, प्रिन्सच्या यशात प्रशिक्षक अमित वशिष्ठ आणि भारताचा माजी १९ वर्षांखालील खेळाडू प्रदीप सांगवान यांचा मोठा वाटा आहे. अमित वशिष्ठ यांनी प्रिन्सला एका टेनिस बॉल स्पर्धेत खेळताना पाहिले आणि त्याला आपल्या अकॅडमीत संधी दिली. तर, प्रदीप सांगवान यांनी प्रिन्सला फिटनेस आणि तांत्रिक बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले
वडिलांची छाती अभिमानाने फुलली
एकेकाळी माजी राष्ट्रपतींच्या भेटीमुळे चर्चेत आलेले खेरा डाबर गाव आज प्रिन्स यादवचे गाव म्हणून ओळखले जात आहे. प्रिन्सच्या यशानंतर त्याच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. "एका एएसआयच्या वेतनावर घर चालवताना मुलाच्या स्वप्नांना पाठबळ देणे कठीण होते, पण आज त्याने आमची मान अभिमानाने उंच केली आहे," अशा भावना राम निवास यांनी व्यक्त केल्या.
प्रशिक्षक अमित वशिष्ठ यांची इच्छा काय?
अमित वशिष्ठ म्हणाले की, "लॉकडाऊनचा काळ प्रिन्स यादव साठीही अत्यंत वाईट ठरला. या कालावधीत त्याला स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. दिल्लीच्या २३ वर्षांखालील संघाकडून खेळण्याची संधी गमवावी लागली. परंतु, दिल्ली प्रीमियर लीगमध्ये त्याने आपला हरवलेला सूर पुन्हा गवसवला. माझे हेच स्वप्न आहे की, प्रिन्स यादवला टीम इंडियाच्या कसोटी संघाकडून खेळताना पाहावे. कारण स्विंग गोलंदाजी हेच त्याचे मुख्य अस्त्र आहे. जर एखादा गोलंदाज पांढऱ्या चेंडूला सहजतेने स्विंग करू शकत असेल, तर तो लाल चेंडूनेही नक्कीच चमत्कार घडवून आणू शकतो."