आयपीएल २०२६ चा थरार आजपासून (२८ मार्च) सुरू होत असतानाच, चेन्नई सुपर किंग्सने धोनीच्या दुखापतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. धोनी सध्या उपचाराच्या प्रक्रियेतून जात असून, डॉक्टरांनी त्याला किमान १५ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, "एमएस धोनी सध्या काफ स्ट्रेनसाठी रिहॅबमध्ये आहे. परिणामी, तो टाटा आयपीएल २०२६ च्या पहिल्या दोन आठवड्यांना मुकण्याची शक्यता आहे. धोनी सुरुवातीचे किमान ४ सामने खेळू शकणार नाही. यामध्ये ३० मार्च: विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR), ३ एप्रिल: विरुद्ध पंजाब किंग्स (PBKS), ५ एप्रिल: विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि ११ एप्रिल: विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) या सामन्यांचा समावेश आहे.
विकेटकीपिंग कोण करणार?
धोनीच्या अनुपस्थितीत 'सीएसके'चा नवा स्टार खेळाडू संजू सॅमसन किंवा उर्वील पटेल यांच्याकडे विकेटकीपिंगची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. धोनीचे वय ४४ वर्षे आहे आणि हे त्याचे शेवटचे आयपीएल असू शकते, असे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच झालेली दुखापत चाहत्यांची चिंता वाढवणारी आहे.
आज होणार सुरुवात... आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामातील उद्धाटनाचा सामना गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध
सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, साखळी फेरीतील पहिले पाच सामने RCB चा संघ आपल्या घरच्या मैदानात खेणार असून अखेरचे दोन सामने ते रायपूरच्या मैदानात खेळणार आहेत.