- मतीन खानस्पोर्ट्स हेड-एव्हीपी लोकमत पत्रसमूह
आतापर्यंत वैभव सूर्यवंशीची कामगिरी चर्चेत राहिलेल्या यंदाच्या आयपीएल सत्रात मंगळवारी रात्री मोठा ट्विस्ट आला. हैदराबादच्या दोन वेगवान गोलंदाजांनी आपल्या पदार्पणातील सामन्यातच खळबळ उडविली. नागपूरचा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे याने आपल्या पहिल्याच षटकात सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआन-ड्रे प्रिटोरिस यांना बाद केले आणि सामन्यात चार बळी घेतले.
दुसरीकडे, त्याचा सहकारी साकिब हुसेन यानेही उत्कृष्ट गोलंदाजी करीत यशस्वी जैस्वाल, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर आणि रवी बिश्नोई यांचे बळी घेत मोठ्या धावा मोजत असलेल्या गोलंदाजांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण केला. विशेष म्हणजे, फलंदाजांसाठी अनुकूल आणि पाटा वाटणाऱ्या खेळपट्टीवर दोघांनी १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करीत राजस्थानच्या धोकादायक स्फोटक फलंदाजी फळीला गुडघे टेकायला भाग पाडले.
दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्षबिहारची राजधानी पाटणापासून १५० किमी दूर गोपालगंज येथील साकिबची कहाणी संघर्ष आणि त्यागाचे भावूक उदाहरण आहे. दोन वेळच्या जेवणाचीही कसरत असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या साकिबचे बालपण अनेक समस्यांनी भरलेले होते. वडील शेतमजुरी करून कुटुंब चालवत होते. गरिबी इतकी होती की, रोजच्या गरजाही पूर्ण होत नव्हत्या. त्यावर मात करणाऱ्या साकिबच्या मनात क्रिकेटबद्दल प्रचंड जिद्द होती.
बॅट विकत घेता आली नाही, म्हणून गोलंदाजसाकिबने सुरुवात फलंदाज म्हणून केली होती. पण, बॅट विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे तो गोलंदाज बनला. मात्र, इथेही अडचणी कमी नव्हत्या. गोलंदाजासाठी आवश्यक असलेले बूटही त्याच्याकडे नव्हते. तो अनेकदा अनवाणी किंवा इतरांचे जुने बूट घालून सराव करीत असे. धावताना पायांना जखमा होत, फोड येत, तरीही त्याने कधी हार मानली नाही.
आईने दागिने विकून घेतले स्पाइक्सएका व्हिडीओमध्ये साकिब सांगतो की, स्पाइक्स (खेळाचे बूट) १०-१५ हजार रुपयांचे होते. बूट घेतले तर जेवण कुठून मिळणार, अशी परिस्थिती होती. शेवटी तो रडू लागल्यावर आईने आपले दागिने विकून त्याला बूट घेऊन दिले. ते फक्त बूट नव्हते, तर आईच्या स्वप्नांचे, विश्वासाचे आणि त्यागाचे प्रतीक होते. त्या दिवशी साकिबने जेव्हा ते स्पाइक्स घातले, तेव्हा तो फक्त खेळाडू नव्हता, तर आईच्या अपेक्षांचे ओझे घेऊन मैदानात उतरला होता. त्या दिवसानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही.
...तर स्वप्ने पूर्ण होऊ शकतातसध्याच्या आयपीएलमध्ये हैदराबादने त्याला ३० लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले. मागील दोन सत्रांपासून साकिब कोलकातासाठी 'नेट बॉलर' होता. भारतीय क्रिकेटमध्ये गरिबी, छोट्या शहरांतून आणि साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या खेळाडूंची मोठी यादी आहे. जसे, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, पांड्या बंधू (हार्दिक आणि कृणाल), जसप्रीत बुमराह, टी. नटराजन आदी. या सर्वांच्या यशोगाथा आपल्याला शिकवितात की, जर ध्येय साध्य करण्याची जिद्द असेल तर पायांवर फोड आले तरी चेहऱ्यावर हास्य ठेवावे लागते. प्रामाणिक मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही...
परवा जालंधरी यांचा शेर आहे,'जिन के होंटों पे हंसी पांव में छाले होंगे,हां वही लोग तुम्हें चाहने वाले होंगे!'
पदार्पणात सर्वोत्कृष्ट 'अनकॅप्ड' गोलंदाज...- साकिब हुसेन २४ धावांत ४ बळी वि. राजस्थान २०२६- अश्विनीकुमार २४ धावांत ४ बळी वि. कोलकाता २०२५- प्रफुल हिंगे ३४ धावांत ४ बळी वि. राजस्थान २०२६
Web Summary : IPL debutants Hinge and Hussain shine despite hardship. Hussain, son of a laborer, overcame poverty, his mother even selling jewelry for cricket shoes. Hinge also impressed, showcasing resilience. Their success proves determination conquers all obstacles.
Web Summary : आईपीएल में हिंगे और हुसैन की शानदार शुरुआत। हुसैन ने गरीबी से लड़कर सफलता पाई, माँ ने क्रिकेट के जूतों के लिए गहने तक बेच दिए। हिंगे ने भी प्रभावित किया। उनकी सफलता दिखाती है कि दृढ़ संकल्प से सब कुछ संभव है।