चेन्नईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने झंझावाती अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान देण्याची मागणीने जोर धरला आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आर.अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली. "वैभव सूर्यवंशी अजूनही लहान असून त्याच्यात जवळपास २५ वर्षे क्रिकेट शिल्लक आहे. वैभवचा भारतीय संघात समावेश करण्याच्या चर्चांमुळे त्याच्यावर विनाकारण दबाव येऊ शकतो, त्यामुळे अशा चर्चांना आताच पूर्णविराम लावण्याची नितांत गरज आहे, असे मत आर. अश्विनने व्यक्त केले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावून जगभरात खळबळ उडवून दिली. तेव्हापासून वैभवने मागे वळून पाहिले नाही. सूर्यवंशीने १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात ८० चेंडूंमध्ये १७५ धावांची धडाकेबाज खेळी केली. चेन्नईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. त्यानंतर भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही मागणी केवळ क्रिकेट चाहत्यांकडूनच नाही, तर भारत आणि परदेशातील दिग्गज आणि माजी क्रिकेटपटूंकडूनही येत आहे.
दिग्गजांची मागणी काय?
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांचा विश्वास आहे की, वैभव सूर्यवंशी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. क्रिकबझशी बोलताना ते म्हणाले की, "मी भारतीय क्रिकेटचा भाग असतो, तर, मी यावर्षीच्या टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यात वैभवचा नक्कीच समावेश केला असता. जरी तो प्रत्येक सामना खेळला नाही, तरी मी त्याला नक्कीच संघात घेतले असते." भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि माजी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू हे देखील या मागणीला पाठिंबा देत आहेत. या दोन्ही दिग्गजांचा विश्वास आहे की, जर वैभवने अशीच कामगिरी सुरू ठेवली, तर लवकरात लवकर त्याचा टीम इंडियामध्ये समावेश केला पाहिजे.
आर अश्विन काय म्हणाला?
अश्विनने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, "वैभवचा भारतीय संघात समावेश करण्याच्या चर्चांमुळे त्याच्यावर विनाकारण दबाव येऊ शकतो आणि कमी वयात मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे वैभव सूर्यवंशीच्या खेळावर परिणाम होऊ शकतो, म्हणून त्याला भारतीय संघात घेण्याच्या चर्चा थांबवा. तो अजूनही लहान आहे. जर महेंद्रसिंह धोनी वयाच्या ४५ वर्षांपर्यंत क्रिकेट खेळत असेल. तर, वैभवमध्ये अजून अडीच दशक क्रिकेट शिल्लक आहे. वैभवला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्या. योग्य वेळी तो भारतीय संघात खेळताना दिसेल. त्याला भारतीय संघात बघण्यासाठी आपण वाट पाहायला हवी. आपल्याला नेहमी इतकी घाई का असते?"