गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील कालचा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने पैसा वसूल ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक लढतीत गुजरातने दिल्लीवर १ धावेने मात करत विजयाची नोंद केली. मात्र, या विजयापेक्षा डगआऊटमध्ये बसलेले संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या रिअॅक्शन सर्वाधिक चर्चा रंगली आहे. सामना निर्णायक वळणावर असताना गुजरातचा कर्णधार शुभमन गिलकडून झालेल्या एका चुकीमळे अशिष नेहरा यांचा पारा चढला, ज्याचा व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सामन्याच्या १६ व्या षटकात एक असा क्षण आला, जेव्हा डगआऊटमध्ये बसलेल्या आशिष नेहरा यांनी आपला संयम पूर्णपणे गमावला. दिल्लीचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने अशोक शर्माच्या गोलंदाजीवर धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्णधार शुभमन गिलने चपळता दाखवत चेंडू फेकला, जो थेट स्टंप्सला लागला. मात्र, दुर्दैवाने चेंडू भरकटला आणि सीमारेषेबाहेर गेल्याने दिल्लीला ओव्हरथ्रोच्या आयत्या ४ धावा मिळाल्या. निर्णायक क्षणी अशा अतिरिक्त धावा गेल्याचे पाहून नेहरा प्रचंड भडकले. रागाच्या भरात त्यांनी जोरात ओरडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुजरातचे दिल्लीसमोर २१० धावांचे आव्हान
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात खराब झाली होती. साई सुदर्शन स्वस्तात बाद झाला. परंतु, त्यानंतर शुभमन गिल (४५ चेंडूत ७० धावा) आणि जोस बटलर (२७ चेडूत ५५ धावा) यांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. या दोघांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने २१० धावांचा डोंगरासारखा टप्पा गाठला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाला २०९ धावांपर्यंत मजल मारता आली.
शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा पराभव
दिल्लीकडून सलामीवीर केएल राहुलने ९२ धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. परंतु, संघाला विजय विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. त्यानंतर डेव्हिड मिलरने सामना दिल्ली बाजुने झुकवला. विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूंवर दिल्लीला केवळ २ धावांची गरज होती. दबावाच्या स्थितीत डेव्हिड मिलरने एक धाव घेण्यास नकार दिला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. मात्र, पुढच्याच चेंडूवर कुलदीप यादव धावबाद झाला आणि दिल्लीच्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.