बंगळुरू : आपण गतविजेते आहोत. ट्रॉफी कायम राखाची असेल तर लवकर ‘स्विच ऑन’ व्हा. जेतेपदाचा बचाव करण्यासाठी प्रत्येक सराव सत्रातील एक मिनिटही वाया घालवू नका, असे कळकळीचे आवाहन दिग्गज विराट कोहली याने बंगळुरू संघातील सहकाऱ्यांना शनिवारी केले.
आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होत आहे. बंगळुरूचा पहिला सामना याच दिवशी चिन्नास्वामी स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध होणार आहे. स्थानिक मैदानावर पहिल्या सराव सत्रादरम्यान कोहली म्हणाला की, ‘गेल्या वर्षी किताब जिंकताना जी जिद्द आणि जोश दाखवला, तोच कायम ठेवणे गरजेचे आहे. आपण गेल्या दोन-तीन सत्रांमध्ये खूप मेहनत केली. त्याच जोरावर गेल्या वर्षी यश मिळविले. आता पुढचा मार्ग अधिक कठीण असेल; कारण इतर संघही जोरदार आव्हान देणार आहेत.’
सहकाऱ्यांना सावध करताना विराट पुढे म्हणाला, ‘आपण वेळ वाया घालवू नये. सर्वांत पुढे राहायचे असेल तर ‘स्विच ऑन’ व्हा. कोणत्याही सत्राचा एक मिनिटही वाया घालवू नका. पुढील अडीच महिन्यांत आपल्याला १२० टक्के योगदान द्यावे लागेल.’ बंगळुरूने यंदा आपल्या ताफ्यात व्यंकटेश अय्यर, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल आणि सात्त्विक देसवाल यांचा समावेश केला आहे.
मुख्य प्रशिक्षक ॲण्डी फ्लॉवर म्हणाले, ‘विराट आणि रजत पाटीदार यांच्या नेतृत्वात अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंना संघात सामील करणे उत्साहवर्धक आहे. यंदा परिस्थिती वेगळी असेल; कारण आपण आता किताब जिंकला आहे. सर्व चाहत्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. मागील सत्र संपले असून, नवी आव्हाने समोर आहेत. हे खूप रोमांचक आहे आणि आम्ही आयपीएल जिंकण्यासाठीच आलो आहोत.’
यश दयालचे काय?
५ कोटी रुपये मोजून वेगवान गोलंदाज यश दयाल याला बंगळुरूने संघात घेतले. त्याने गेल्या वर्षी बंगळुरूला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर एका अल्पवयीन मुलीच्या संबंधित प्रकरणात अडचणीत आला.
राजस्थानमध्ये त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. गझियाबादमधील एका महिलेनेदेखील शारीरिक अत्याचार, लैंगिक शोषण आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
सध्या तो अटकपूर्व जामिनावर असून न्यायालयीन खटला सुरू आहे. त्यामुळे आयपीएल २०२६ खेळणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर बंगळुरूच्या टीम बसवर यश दयालचा फोटो नसल्याने विविध अंदाज लावले जात आहेत.
यश दयालने श्वेता पुंडिरशी नुकतेच गुपचूप लग्न उरकले. मात्र, दोघांपैकी कोणीही अधिकृतरीत्या लग्नाबाबत घोषणा केलेली नाही. दयालने ४३ आयपीएल सामन्यांत ४१ बळी घेतले आहेत. बंगळुरूसाठी २९ सामन्यात त्याने २८ गडी बाद केले.
कोहली आणि आयपीएल
विराट बंगळुरूकडून यंदा १९ वे सत्र खेळेल. २६७ सामन्यांत ८६६१ धावा काढणारा आयपीएलमधील एकमेव फलंदाज. आतापर्यंत ८ शतके, ६३ अर्धशतकांची नोंद. मागच्या सत्रात ५४.७५ च्या सरासरीने ६५७ धावा ठोकल्या. सत्रात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल.
Web Summary : Virat Kohli urged his Bangalore teammates to maximize practice for their title defense. The team added new players, while the participation of Yash Dayal, facing legal issues, remains uncertain. Kohli is set for his 19th season.
Web Summary : विराट कोहली ने बैंगलोर के साथियों से खिताब बचाने के लिए अभ्यास का अधिकतम लाभ उठाने का आग्रह किया। टीम ने नए खिलाड़ियों को जोड़ा, जबकि कानूनी मुद्दों का सामना कर रहे यश दयाल की भागीदारी अनिश्चित है। कोहली अपना 19वां सीजन खेलने के लिए तैयार हैं।