भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर काल (१ एप्रिल २०२६) खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा ६ विकेट्सने पराभव केला. अवघ्या २६ धावांत ४ गडी गमावलेल्या दिल्लीने समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या अभूतपूर्व खेळीच्या जोरावर अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. मात्र, दिल्लीच्या विजयानंतर लखनौच्या संघाचे मालक संजीव गोएंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातील चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भर मैदानात हाय व्होल्टेज ड्रामा
हा सामना संपल्यानंतर मैदानावर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. लखनौ संघाचे मालक संजीव गोएंका, कर्णधार ऋषभ पंत आणि प्रशिक्षक जस्तिन लँगर यांच्यात भर मैदानावर जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोएंका काहीसे चिडलेले दिसत होते. तर पंत आपले मत मांडताना दिसला. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हा पराभव रणनीतीतील चुकीमुळे झाला की गोलंदाजांच्या अपयशामुळे, यावर संघ व्यवस्थापनात खडाजंगी झाल्याचे चित्र दिसत आहे.
समीर रिझवीने आणि ट्रिस्टन स्टब्स दमदार फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीसमोर १४२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. घरच्या मैदानावर खेळताना लखनौची फलंदाजी काहीशी संथ राहिली, ज्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हे माफक लक्ष्य गाठताना दिल्लीची सुरुवातही अत्यंत खराब झाली. दिल्लीची अवस्था २६/४ अशी झाली असताना सामना लखनौच्या खिशात गेल्याचे वाटत होते. मात्र, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या समीर रिझवीने आणि ट्रिस्टन स्टब्सने सामन्याचे चित्र पालटले. समीर रिझवीने ४७ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली. तर, ट्रिस्टन स्टब्सने ३२ चेंडूत नाबाद ३९ धावांची खेळी दिल्लीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दोघांनी मिळून नाबाद ११९ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि १७.१ षटकांतच दिल्लीला विजय मिळवून दिला.
पुढील सामने
या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचा आत्मविश्वास उंचावला असून त्यांचा पुढचा सामना ४ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, पराभवाचा धक्का बसलेला लखनौचा संघ ५ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरेल.