Delhi Capitals vs Gujarat Titans, 14th Match : दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला अवघ्या १ धावेनं पराभूत करत पहिला विजय नोंदवला आहे. दुखापतग्रस्त झाल्याने मैदान सोडलेला किलर मिलर अर्धा संघ तंबूत परतल्यावर पुन्हा मैदानात उतरला. अखेरच्या १२ षटकात ३६ धावांची गरज असताना KL राहुल बाद झाल्यावर डेविड मिलरनं दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मॅचमध्ये आणले. पण अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर मिलरनं एक धाव घेण्यास नकार दिला. १ चेंडूवर २ धावांची गरज असताना प्रसिद्ध कृष्णानं निर्धाव चेंडू टाकला अन् विक्रमी धावांचा पाठलाग करण्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ अपयशी ठरला. अवघ्या एका धावेनं गुजरात टायटन्सनं हा सामना जिंकत यंदाच्या हंगामातील पहिला विजय निश्चित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KL राहुलनं दाखवला क्लास! मिलरनं किलर खेळीसह DC ला मॅचमध्ये आणलं, पण...
गुजरात टायटन्सच्या संघाने दिलेल्या २११ धावांचा पाठलाग करताना पथुम निसंका आणि लोकेश राहुल जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. निसंका २४ चेंडूत ४१ धावा करून परतल्यावर लोकेश राहुलनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ५२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९२ धावा करत सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं सेट केला. पण मोहम्मद सिराजनं १७ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर लोकेश राहुलची विकेट घेत सामन्यात ट्विस्ट आणले. संघ अडचणीत सापडला असताना बोटाच्या दुखापतीमुळे मैदान सोडलेला डेविड मिलर पुन्हा मैदानात उतरला. २० चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ४१ धावा करत त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण अखेरच्या षटकात १३ धावांचा बचाव करताना प्रसिद्ध कृष्णानं १० धावा खर्च करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दिल्लीच्या संघ निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात २०९ धावांवरच अडखळला.
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
धावांचा बचाव करताना GT कडून राशीद खानची कमाल!
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धावांचा बचाव करताना गुजरात टायटन्सच्या संघाकडून राशीद खान याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने १० व्या षटकात नितीश राणा आणि समीर रिझवी बॅक टू बॅक तंबूचा रस्ता दाखवला. हा मॅचचा टर्निंग पॉइंट होता. त्यामुळेच त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय अक्षर पटेलच्या रुपात त्याने तिसरी विकेट घेतली. निर्णायक षटक टाकणाऱ्या प्रसिद्ध कृष्णानं २ तर मोहम्मद सिराजनं १ विकेट घेतली.
शुभमन गिलसह बटल-वॉशिंग्टन सुंदरच्या भात्यातून अर्धशतक
पहिल्यांदा फलंदाजी करताना साई सुदर्शनच्या रुपात गुजरात टायटन्सच्या संघाने १९ धावांवर पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर जोस बटलर आणि शुभमन गिल जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूत ६० धावांची दमदार भागीदारी रचली. जोस बटलरने २७ चेंडूत ५२ धावांची दमदार खेळी केली. कर्णधार शुभमन गिलनं ४५ चेंडूत ७० धावा तर वॉशिंग्टन सुंदरनं ३२ चेंडूत ५५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावरच गुजरात टायटन्सनं २१० धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर तगडे आव्हान ठेवले होते.