Prithvi Shaw: IPL 2026 Auction मध्ये मुंबईकर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला अखेर खरेदीदार मिळाला. गेल्या हंगामात कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. यावेळीही सुरुवातीला त्याला कुणीच भाव दिला नाही. पण अखेर दिल्ली कॅपिटल्सने त्याला खरेदी केले. त्यातच या लिलावादरम्यान पृथ्वी शॉ ने एक चूक केली होती, जी त्याला नंतर दुरुस्त करावी लागली.
अखेरच्या क्षणात मिळाला खरेदीदार
यंदाच्या लिलावात पृथ्वी शॉला खूप उशिरा संघ मिळाला. लिलावाच्या पहिल्या फेरीत शॉचे नाव आले, पण त्याच्यावर कुणीही बोली लावली नाही. यानंतर, पुन्हा एकदा पृथ्वी शॉचे नाव आले, त्यावेळीही पुन्हा कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. यानंतर पृथ्वी शॉ याने मनातून हार मानली होती आणि यंदाच्या IPLलाही त्याला मुकावे लागणार असे वाटले. त्यामुळे त्याने सोशल मीडियावर हार्टब्रेकचा इमोजी पोस्ट केला आणि लिहिले, "ठीक आहे."
अचानक चमत्कार झाला अन्...
पृथ्वी शॉ खूपच निराश झाला, पण नंतर अचानक चमात्कार घडला. पृथ्वी शॉ याचे नाव पुन्हा लिलावासाठी आले आणि यावेळी दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी बोली लावली. दिल्लीने त्याला मूळ ७५ लाखांच्या किमतीला विकत घेतले. IPL 2026च्या लिलावात खरेदीदार मिळाल्यानंतर, पृथ्वी शॉ याने ती स्टोरी डिलीट केली. पण नेटकऱ्यांनी पृथ्वी शॉ याच्या स्टोरीचा आधीच स्क्रीनशॉट घेतला होता, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पृथ्वी शॉ याची कारकीर्द
पृथ्वी शॉने आयपीएलमध्ये गेल्या काही हंगामात विशेष प्रभावी कामगिरी केलेली नाही. पण त्याने ७९ सामन्यांमध्ये २३.९४ च्या सरासरीने केवळ १,८९२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १४ अर्धशतके आहेत. पण पृथ्वी शॉ प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला या हंगामात दिल्ली संघाने संधी दिली आहे.