यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये अशा खेळाडूची एन्ट्री झाली आहे, ज्याची आई मंदिराबाहेर फुले विकते तर वडील मैदानावर हिरवळ कापणे आणि पिच बनविण्यास मदत करण्याचे काम करतात. आईची देवाची सेवा आणि वडिलांची क्रिकेटच्या मैदानाशी असलेली नाळ या मुलाला आयपीएलमध्ये फळाला आली आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब फळफळले आहे, यात श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसंका याचेही नाव आहे.
दिल्ली कॅपिटल्सने निसंकाला ४ कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात सामील करून घेतले आहे. निसंका याची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. निसंकाच्या आयुष्यात आता कोट्यवधींच्या कराराने नवे वळण घेतले आहे. त्याच्यातील टॅलेंटने त्याला हे सर्व मिळवून दिलेले असले तरी आई वडिलांच्या कष्टाला सर्वजण सलाम करत आहेत.
मंदिराबाहेर फुले विकणाऱ्या मातेचा मुलगा पाथुम निसंकाचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. त्याचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील सुनील हे गाले क्रिकेट मैदानावर ग्राऊंड्समन म्हणून काम करायचे, तर त्याची आई उदरनिर्वाहासाठी मंदिराबाहेर फुले विकण्याचे काम करायची. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निसंकाने आपले क्रिकेटचे स्वप्न जिवंत ठेवले आणि आज तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगचा भाग बनला आहे.
अशी आहे जबरदस्त कामगिरी
निसंका सध्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडेमध्ये त्याने ६३ पेक्षा जास्त सरासरीने ६९४ धावा. तर टी-२० मध्ये १८ सामन्यात १५० च्या स्ट्राईक रेटने ६२५ धावा, ज्यात एका शतकाचा समावेश आहे. ILT20 मध्ये त्याने ५ सामन्यात २२६ धावा कुटल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सला एका आक्रमक सलामीवीराची गरज होती, जी निसंका पूर्ण करू शकतो. त्याच्या समावेशामुळे दिल्लीची फलंदाजी अधिक भक्कम होणार आहे.