जगातील सर्वात स्फोटक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक लियाम लिव्हिंगस्टोन आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरला. लिव्हिंगस्टोनची मूळ किंमत २ कोटी असूनही कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. लियाम लिव्हिंगस्टोनची गणना जगातील उत्कृष्ट ऑलराउंडरमध्ये केली जाते. परंतु, आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही, जो क्रिडाविश्वासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
लियाम लिव्हिंगस्टोन २०२५ च्या आयपीएल हंगामात विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा महत्त्वाचा भाग होता. मात्र, त्या हंगामात त्याची बॅट शांत राहिली होती. त्याने आठ डावांमध्ये केवळ ११२ धावा केल्या होत्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश होता. गोलंदाजीतही त्याला खास कामगिरी करता आली नाही. संपूर्ण हंगामात त्याने नऊ षटके टाकली आणि फक्त दोन विकेट्स मिळवल्या. त्यामुळेच तो अनसोल्ड राहिल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
फॉर्ममध्ये असूनही वगळलं
लिव्हिंगस्टोनची टी-२० कारकीर्द तशी प्रभावी आहे. त्याचा स्ट्राइक रेट १४५.०६ चा आहे. आयपीएलनंतर त्याने आपल्या फॉर्ममध्ये कमालीची सुधारणा केली. बर्मिंगहॅम फिनिक्सचे नेतृत्व करताना त्याने २४१ धावा कुटल्या आणि सात विकेट्सही घेतल्या. तो त्याच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यानंतर लँकेशायर संघाकडून खेळताना त्याने २६० धावा आणि सहा विकेट्स घेत आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते.
क्रिकेट विश्वाला मोठा धक्का
सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही आयपीएलमधील मागील खराब फॉर्म आणि परदेशी खेळाडूंच्या कोट्यामुळे फ्रँचायझींनी त्याच्याकडे पाठ फिरवली असण्याची शक्यता आहे. मोठी फटकेबाजी आणि लेग-स्पिन व ऑफ-स्पिन अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू अनसोल्ड राहिल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.