इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने सुरुवातीच्या काही सामन्यांमधून माघार घेतल्याने सोशल मीडियावर त्याच्या कमिटमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता या सर्व वादावर खुद्द स्टार्कने मौन सोडले असून टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मिचेल स्टार्क आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध नसल्याची बातमी समोर आल्यानंतर, भारतीय मीडिया आणि काही चाहत्यांनी तो जाणीवपूर्वक आयपीएल टाळत असल्याचा आरोप केला होता. स्टार्कने आपल्या देशाच्या क्रिकेटला (ऑस्ट्रेलिया) प्राधान्य देऊन आयपीएलकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली होती. या अफवांना पूर्णविराम देत स्टार्कने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
स्टार्क म्हणाला की, "काही लोक त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून माझ्या फिटनेसबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यांना माझ्या शरीराबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती असल्याचा दावा ते करत आहेत. ऑस्ट्रेलियन उन्हाळी हंगामात मला खांदा आणि कोपराची दुखापत झाली होती, ज्याची गंभीरता सुरुवातीला लक्षात आली नाही." स्टार्कने पुढे स्पष्ट केले की, तो सध्या रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात असून तो गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही. "मी जर गोलंदाजीच करू शकत नसेल, तर खेळणार कसा?" असा सवालही त्याने उपस्थित केला.
वादावर उत्तर देतानाच स्टार्कने सामंजस्य दाखवत दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी आणि चाहत्यांची माफीही मागितली आहे. आपली अनुपस्थिती संघासाठी नुकसानकारक असल्याचे आपल्याला ठाऊक आहे आणि लवकरात लवकर मैदानात परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्याने सांगितले. केवळ स्टार्कच नाही, तर ऑस्ट्रेलियाचे इतर प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड देखील वर्कलोड मॅनेजमेंट आणि दुखापतींमुळे आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. आगामी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत सावध पवित्रा घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्सवर परिणाम
दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना १ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. स्टार्कच्या अनुपस्थितीत दिल्लीला त्यांच्या गोलंदाजीच्या रणनीतीत मोठे बदल करावे लागणार आहेत. एनरिक नॉर्खिया किंवा टी. नटराजन यांच्यावर आता वेगवान गोलंदाजीची मदार असण्याची शक्यता आहे.