आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी आयपीएलच्या यंदाच्या हंगामात म्हणावी तशी चांगली झालेली नाही. पहिला सामना जिंकल्यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच या दोन्ही सामन्यांतील पराभवानंतर महेंद्र सिंग धोनीची फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच यावरून विरोधकांनी धोनीला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं. मात्र चेन्नईच्या फलंदाजीच्या क्रमवारीत धोनी तळाच्या क्रमांकावर का फलंदाजीस येतोय, यामागचं धक्कादायक कारण अखेर चेन्नई सुपरकिंग्सचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी समोर आणलं आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात महेंद्रसिंग धोनी कधी आठव्या तर कधी नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येत आहे. यावर्षी आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये मिळून धोनीने केवळ ४६ धावा केल्या आहेत. धोनी तळाच्या क्रमांकावर फलंदाजीस येत असल्याने त्याचा फटका चेन्नईला बसत आहे. तसेच धोनी एवढ्या उशिरा का फलंदाजीस येतो,असा प्रश्न चेन्नईचे चाहतेही विचारत आहेत.
दरम्यान, याबाबत चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, महेंद्रसिंग धोनी गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजत आहे. त्याची दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यातच त्याचं शरीर आणि गुडघा आता त्याला आधीसारखी साथ देत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आता १० षटकेही फलंदाजी करणं कठीण बनलेलं आहे. अशा परिस्थितीत धोनी षटकांच्या हिशेबाने फलंदाजीस येतो. सध्या धोनी दहा षटके फलंदाजी करू शकत नाही, अशा परिस्थितीत संघासाठी अधिकाधिक योगदान कसं देता येईल, याचा विचार तो करतो, असे फ्लेमिंग म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, मी मागच्याच वर्षा म्हणालो होतो की, धोनी आमच्यासाठी मौल्यवान आहे. नेतृत्व आणि यष्टीरक्षणासोबत ९-१० षटके फलंदाजीसाठी उतरणं योग्य ठरणार नाही.