इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामातील ५७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ईडन गार्डन्सच्या मैदानातील कोलकाता विरुद्धच्या सामन्यात नव्या भिडूला पदार्पणाची संधी दिली. उर्विल पटेल याने चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. दुखापतग्रस्त वंश बेदीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जच्या संघात गुजरातच्या विकेट किपर बॅटर उर्विल पटेल याला वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळालीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छोट्याखानी खेळीत साधला मोठा डाव
पदार्पणाच्या सामन्यात त्याने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारत खाते उघडल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या डावातील पहिल्याच षटकात वैभव अरोरानं दुसऱ्याच चेंडूवर आयुष म्हात्रेला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या उर्विल पटेल याने एक चेंडू निर्धाव खेळल्यावर वैभवच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारत खाते उघडले. ११ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने त्यने ३१ धावा कुटल्या. स्फोटक खेळी मोठी करण्यात तो अपयशी ठरला. पण या खेळीसह त्याने इंग्लिश क्रिकेटर लुक राइट (Luke Wright) पाठोपाठ IPL मध्ये पदार्पणात सर्वाधिक स्ट्राइक रेटनं धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
टी-२० क्रिकेटमध्ये २८ चेंडूत शतक झळकावल्याचा रेकॉर्ड
उजव्या हाताने स्फोटक फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या २६ वर्षीय उर्विल पटेलला ३० लाख या मूळ किंमतीसह चेन्नईने आपल्या संघात घेतले आहे. उर्विल पटेल याने २०२४-२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ६ डावात ७८.७५ च्या सरासरीसह जवळपास २३० च्या स्ट्राइक रेटनं ३१५ धावा करत सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. त्याचा संघ नॉकआउटमध्ये पोहचला नसला तरी या पठ्ठ्यानं या स्पर्धेत २९ षटकार मारत आपल्यातील बिग हिटरची झलक दाखवून दिली होती. इंदुच्या मैदानात रंगलेल्या त्रिपुरा विरुद्धच्या सामन्यात उर्विल पटेल याने २८ चेंडूत शतक साजरे करून खास विक्रम रचला होता. टी-२० क्रिकेटमध्ये संयुक्तरित्या हे सर्वात जलद शतक आहे.
टी-२० सह रणजी क्रिकेटमध्येही केलाय मोठा धमाका
उर्विल पटेल याने ४७ डावात टी २० मध्ये १७०.३८ च्या स्ट्राइक रेटनं ११६२ धावा केल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केल्यावर रणजी क्रिकेटमध्येही त्याने खास छाप सोडलीये. राजकोटच्या मैदानात सौराष्ट्र विरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने १९७ चेंडूत कारकिर्दीतील १४० धावांची खेळी केली होती.