Jos Buttler Catch Video, IPL 2025 GT vs DC: दिल्ली कॅपिटल्सने गुजरातच्या मैदानावर गुजरात टायटन्सला २० षटकात २०४ धावांचे आव्हान दिले. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार अक्षर पटेलच्या ३९, आशुतोष शर्माच्या धडाकेबाज ३७ आणि त्रिस्टन स्टब्स, करूण नायरच्या प्रत्येकी ३१ धावांच्या जोरावर दिल्लीने ८ बाद २०३ धावसंख्येपर्यंत मजल मारली. गुजरातकडून वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने ४१ धावांत सर्वाधिक ४ बळी टिपले. त्याच्याच गोलंदाजीवर यष्टीरक्षक जोस बटलरने टिपलेला सुपरमॅन झेल विशेष लक्षवेधी ठरला.
दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी सुरु असताना डावाच्या १८व्या षटकात जॉस बटलरने अप्रतिम झेल टिपला. प्रसिध कृष्णाने षटकाच्या पहिल्या चेंडूवर अक्षर पटेलला बाद केले. त्यानंतर नवखा विपराज निगम फलंदाजीला आला. प्रसिध कृष्णाने इनस्विंग चेंडू टाकला. विपराज निगमने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी यष्टीरक्षक जोस बटलरने सुपरमॅनसारखी हवेत उडी घेत भन्नाट झेल टिपला. पाहा व्हिडीओ-
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक पोरेल आणि करूण नायर जोडीने चांगली सुरुवात केली. अभिषेक पोरेल ९ चेंडूत १८ धावांवर बाद झाला. केएल राहुलने १४ चेंडूत २८ धावांची दमदार फलंदाजी केली. तर करूण नायरने १८ चेंडूत ३१ धावांची फटकेबाजी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया घालून दिला. अक्षर पटेल ३२ चेंडूत ३९ तर ट्रिस्टन स्टब्स २१ चेंडूत ३१ धावांवर माघारी परतले. विपराज निगमला शून्यावर झेलबाद व्हावे लागले. आशुतोष शर्माने ३७ धावा करत संघाला २०३ धावांपर्यंत मजल मारून दिली.