Rishabh Pant Missed Stumping Video, IPL 2025 LSG vs DC: लखनौ संघाला पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने २० षटकांत ८ बाद २०९ धावा उभारल्या होत्या. हे आव्हान दिल्लीने १९.३ षटकांत ९ बाद २११ धावा करून पार केले. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा अर्धा संघ ४० चेंडूंत ६५ धावांत गारद झाला होता. परंतु, आशुतोष आणि विपराज यांनी सातव्या गड्यासाठी २२ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी करत दिल्लीला विजयी मार्गावर आणले. कर्णधार ऋषभ पंतकडून निर्णायक क्षणी झालेल्या चुकीमुळे लखनौला एका गड्याने पराभव पत्करावा लागला. आशुतोष शर्माचे तडाखेबंद नाबाद अर्धशतक आणि विपराज निगमचा निर्णायक अष्टपैलू खेळ दिल्लीसाठी मोलाचा ठरला.
तब्बल २०९ धावा उभारल्यानंतर लखनौने दिल्लीची ५ बाद ६५ अशी अवस्था केली होती. त्यानंतर आशुतोष आणि विपराज यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करत दिल्लीला विजयी मार्गावर आणले. १७व्या षटकात विपराज बाद झाल्यानंतर आशुतोषने एकट्याने अखेरपर्यंत किल्ला लढवत दिल्लीला विजयी केले. अखेरच्या षटकात दिल्लीला ६ धावांची, तर लखनौला केवळ एका बळीची गरज असताना ऋषभ पंतने पहिल्याच चेंडूवर मोहित शर्माला यष्टिचीत करण्याची संधी गमावली आणि येथेच सामना लखनौच्या हातून निसटला. पाहा पंतने गमावलेली स्टंपिंगची संधी, व्हिडीओ-
त्याआधी, मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांच्या जोरावर लखनौने धावांचा डोंगर उभारला. एडेन मार्करम आणि मार्श यांनी लखनौला स्फोटक सुरुवात करून दिली. मार्करम बाद झाल्यानंतर मार्श आणि पूरन यांनी दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ४२ चेंडूंत ८७धावांची भागीदारी केली. मार्शने केवळ २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. पूरनने ट्रिस्टन स्टब्सला १३व्या षटकात सलग ४ षटकार आणि एक चौकार मारत २८ धावा चोपल्या. दिल्लीकडून शार्दूल ठाकूर, मनिमरन सिद्धार्थ, दिग्वेश राठी आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
सामन्यातील महत्त्वाच्या बाबी
- टी-२० क्रिकेटमध्ये ६००हून अधिक षटकार मारण्याचा पराक्रम करणारा निकोलस पूरन हा ६०६ षटकारांसह ख्रिस गेल (१०५६), किएरॉन पोलार्ड (९०८) आणि आंद्रे रसेल (७३३) यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला.
- केवळ २१ चेंडूंत अर्धशतक झळकावत मिचेल मार्शने लखनौ संघाकडून पाचवे वेगवान अर्धशतक झळकावले.
- मिचेल मार्श लखनौकडून वेगवान अर्धशतक झळकावणारा दुसरा सलामीवीर ठरला. याआधी काएल मायर्स याने २० चेंडूंत (पंजाबविरुद्ध, २०२३) आणि २१ चेंडूंत (चेन्नईविरुद्ध, २०२३) अर्धशतक झळकावले.
- आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ऋषभ पंत पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला.