Ricky Ponting Viral Video, IPL 2025 Punjab Kings: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघासोबत आहे. या हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच पंजाबने त्याला मुख्य प्रशिक्षक बनवले. यावेळी, रिकी पॉन्टिंगच्या प्रशिक्षणाखाली पंजाब संघाने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या ४ सामन्यात ३ विजयांसह ते पॉइंट टेबलमध्ये ५ व्या स्थानावर आहेत. यादरम्यान, रिकी पॉन्टिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये रिकी पॉन्टिंग कचरा वेचून डस्टबिनमध्ये टाकताना दिसला.
रिकी पॉन्टिंगला वेचला कचरा...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला रिकी पॉन्टिंगचा व्हिडिओ पंजाब किंग्ज संघानेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ संघाच्या सरावानंतरचा आहे. जेव्हा खेळाडू सरावानंतर परतले तेव्हा रिकी पॉन्टिंग शेवटपर्यंत मैदानातच राहिला. व्हिडिओमध्ये, पॉन्टिंग संघाच्या सरावानंतर मैदानावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या उचलताना दिसला. तो सगळा कचरा उचलून त्याने कचऱ्याच्या डब्यात टाकला. पॉन्टिंगचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत आणि सलाम करत आहेत. पाहा व्हिडीओ-
पंजाब संघाच्या खेळाडूंवर टीका
एकीकडे रिकी पॉन्टिंगचे कौतुक होत असताना पंजाबच्या खेळाडूंवर टीका केली जात आहे. पॉन्टींगने गोळा केलेला कचरा पंजाबचे खेळाडू सराव करतानाचा होता. खेळाडूंनी तो कचरा तसाच टाकून दिला. त्यामुळे चाहते पंजाब किंग्जच्या खेळाडूंवर टीका करत आहेत आणि रिकी पॉन्टिंगने या खेळाडूंना शिकवण देण्याचा सल्ला देत आहेत.