IPL 2025, Sunrisers Hyderabad Team Sign South Africa Wiaan Mulder : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या हंगामा आधी काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. १ कोटींचा डाव खेळून ताफ्यात सामील केलेल्या इंग्लंडच्या ब्रायडन कार्सनं (Brydon Carse ) दुखापतीमुळे आगामी हंगामातून माघार घेतली आहे. पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर आयपीएलमधून माघार घेण्याची वेळ आलीये. या धक्क्यातून सावरण्यासाठी सनरायझर्स हैदराबादच्या संघानं आता नव्या भिडूवर डाव खेळलाय. आयपीएल फ्रँचायझी संघानं दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डर (Wiaan Mulder) संघात सामील करून घेतलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मेगा लिलावात लागला होता अनसोल्डचा टॅग
आयपीएलच्या मेगा लिलावात मुल्डर याने ७५ लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. पण लिलावात त्याला संघात घेण्यासाठी कुणीही रस दाखवला नव्हता. अनसोल्ड राहिलेल्या या गड्याला आता मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करत काव्या मारनच्या संघानं त्याला 'लखपती' केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा २७ वर्षीय गोलंदाज त्या संधीच सोनं करून कोट्यवधीच्या घरात पोहचणार का? ते बघण्याजोगे असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मिळाला भावमुल्डरनं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून १८ कसोटी, २५ वनडे आणि ११ टी २० सामने खेळले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही मुल्डर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग होता. ३ सामन्यात त्याने ६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले. मुल्डर हा चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडासह संयुक्तरित्या अव्वलस्थानी राहिला.
आयपीएलमध्ये पदार्पणासाठी सज्ज असलेल्या खेळाडूची टी-२० तील कामगिरी
मुल्डर हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करण्यासोबत जलदगती गोलंदाजी करणऱ्या या खेळाडूनं १२८ टी-२० सामन्यात २१७१ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या खात्यात ६७ विकेट्सची नोंद आहे. सनरायझर्स हैदराबादकडून तो आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. दक्षिण आफ्रिकेतील २० लीगमध्येही तो सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीचा भाग होता.
Web Title: IPL 2025 Update Injured Brydon Carse Ruled Out Kavya Maran Owned Sunrisers Hyderabad Team Sign South Africa Wiaan Mulder
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.