IPL 2025 DC vs RR Super Over turning point Video: आयपीएल ही एक आव्हानात्मक स्पर्धा आहे. या स्पर्धेत क्रिकेटच्या मैदानावर दररोज काही ना काही नवीन घडत असते. यंदाच्या हंगामाला सुरुवात होऊन ३० पेक्षा जास्त सामने झाले होते, तरीही सुपर ओव्हरचा थरार चाहत्यांना अनुभवता आला नव्हता. अखेर हंगामातील ३२व्या सामन्यात बुधवारी सुपर ओव्हरचा थरार रंगला. नियमित सामन्यात दिल्लीने प्रथम तर राजस्थानने नंतर फलंदाजी करताना प्रत्येकी १८८ धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने उत्तम सुरुवात केली होती, पण एका चेंडूमुळे अख्खा सामना राजस्थानच्या विरोधात गेला आणि दिल्लीला सोपे आव्हान मिळाले.
असा रंगला सुपर ओव्हरचा थरार !
सुपर ओव्हरमध्ये राजस्थानकडून प्रथम फलंदाजीसाठी शिमरॉन हेटमायर आणि रियान पराग दोघे आले. मिचेल स्टार्कने शिमरॉन हेटमायरला पहिला चेंडू निर्धाव टाकला तर दुसऱ्या चेंडूवर चौकार गेला. तिसऱ्या चेंडूवर १ धाव घेण्यात आली. चौथ्या चेंडूवर रियान परागने चौकार मारला आणि तो नो बॉल ठरला. त्यामुळे राजस्थानची धावसंख्या ३ चेंडूत १० धावा अशी झाली होती.
सुपर ओव्हरमध्ये इथे फिरला सामना...
पुढला चेंडू फ्री हिट होता. त्यामुळे रियान परागकडे मोठा फटका मारून धावसंख्या वाढवण्याची संधी होती. पण इथूनच सामन्याला कलाटणी मिळाली. चौथ्या चेंडूवर रियान पराग एकही धाव पूर्ण न करता रनआऊट झाला. तरीही पुढील दोन चेंडू शिल्लक होते. त्यावेळी हेटमायरने खूपच गोंधळ घातला आणि त्याचा परिणाम यशस्वी जैस्वालला भोगावा लागला. जैस्वाल दुहेरी धाव घेताना बाद झाला. त्या चेंडूवर केवळ १ धाव मिळाली आणि दोन गडी बाद झाल्याने राजस्थानचा सुपर ओव्हरचा डाव ११ धावांवर आटोपला.
संदीप शर्माची गोलंदाजी कमी प्रभावी
१२ धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून ट्रिस्टन स्टब्स आणि केएल राहुल फलंदाजीसाठी आले. संदीप शर्माची गोलंदाजी थोडीशी कमी प्रभावी ठरली. पहिला चेंडू स्लो बाऊन्सर आल्याने राहुलला दोन धावा घेता आल्या. त्यातही तो रनआऊट होता होता वाचला. पुढला चेंडू पुन्हा तसाच येणार याची कल्पना असल्याने राहुलने ऑफसाईडला चौकार लगावला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे पुढला चेंडू यॉर्कर आला आणि राहुलने १ धाव घेतली. दिल्लीचा स्कोअर ३ चेंडूत ७ धावा झाला होता. त्यांना पुढील ३ चेंडूत केवळ ४ धावा हव्या होत्या. त्यावेळी पुन्हा एकदा संदीप शर्माने अपेक्षेप्रमाणे स्लो बाऊन्सर टाकला आणि ट्रिस्टन स्टब्स चेंडू थेट मैदानाबाहेर टोलवत संघाला विजय मिळवून दिला.