Join us

मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

Sunil Gavaskar: आयपीएल २०२५ मध्ये कोणता संघ ट्रॉफी जिंकेल, याबाबत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भविष्यवाणी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 18:02 IST

Open in App

आयपीएल २०२५ शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच साखळी संपणार असून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी यंदाच्या आयपीएल विजेत्या संघाबाबत भविष्यवाणी केली. मुंबई इंडियन्स किंवा पंजाब किंग्ज नाहीतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यंदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरेल, अशी त्यांनी भविष्यवाणी केली आहे. यंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. आरसीबीने १० पैकी सात सामने जिंकले आहेत. तर, तीन सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. आरसीबीचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

'या हंगामात आरसीबीने चांगली कामगिरी केली. आरसीबीच्या संघात टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिकल आणि जोश हेझलवूड यांसारखे सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. मुंबईचा एकमेव संघ आहे, जो आरसीला टक्कर देऊ शकतो. परंतु, यंदा आरसीबी हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे', असे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.

सुनील गावस्कर काय म्हणाले? स्पोर्ट्स टुडेशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, 'आरसीबीने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किवा क्षेत्ररक्षण असो तिन्ही विभागात संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सही शर्यतीत आहे. पण त्यांनी नुकतीच आघाडी घेतली. पण मुंबईची विजयी घौडदौड सुरू राहील का? हा प्रश्न आहे. कारण मुंबईला त्यांचे पुढील तिन्ही सामने मोठ्या संघाविरुद्ध खेळायची आहेत. त्यामुळे ते कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पण आरसीबी निश्चितच जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.'

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसुनील गावसकर