IPL 2025 SRH vs PBKS Player to Watch Travis Head Sunrisers Hyderabad : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गत चॅम्पियन्स सनरायझर्स हैदराबादच्या संघाने अगदी धमाक्यात सुरुवात केली. पण पहिल्या विजयानंतर आघाडीच्या फलंदाजांचा फ्लॉप शोमुळे संघाला सलग ४ पराभवाचा सामना करावा लागला. फलंदाजी ही या संघाची ताकद आहे. ही ताकद पुन्हा दाखवायची असेल तर ट्रॅविस हेडच्या भात्यातून फटकेबाजी गरजेची आहे. प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणारा ट्रॅविस हेड सध्या सनरायझर्स हैदराबादसाठी डोकेदुखी ठरताना दिसतोय. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा जुन्या रंगात खेळताना दिसणार का? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ट्रॅविस हेडनं पहिल्या दोन सामन्यात धमाकेदार खेळी केली, पण...
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ट्रॅविस हेडनं अपेक्षेप्रमाणे संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. या सामन्यात त्याने ३१ चेंडूत ६७ धावा केल्या होत्या. पण या सामन्यात शतकी खेळीनं इशान किशन चर्चेत राहिला. लखनौ विरुद्धच्या सामन्यात ट्रॅविस हेडनं २८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर मात्र त्याचा फ्लॉप शोच पाहायला मिळाला. त्याच्या फॉर्मसोबत SRH संघाच्या आघाडीतील ताकदच गायब झालीये. जर तो पुन्हा तोऱ्यात खेळला तर अन्य फलंदाजांनाही त्याचा फायदा मिळू शकतो.
मागील ३ सामन्यातील ट्रॅविस हेडची कामगिरी
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यापासून तो मोठी धावसंख्या करताना संघर्ष करताना दिसतोय. तिसऱ्या सामन्यात त्याच्या भात्यातून १२ चेंडूत २२ धावा आल्या होत्या. कोलकाता विरुद्धच्या चौथ्या सामन्यात तो २ चेंडूत चार धावांवर तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. गुजरात विरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही त्याला दुहेरी आकडा गाठता आला नव्हता.
नंबर वन खेळाडूकडून टॉप क्लास कामगिरीची आस ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेड हा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील नंबर वन बॅटर आहे. त्याच्यासोबत सनरायझर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात करणारा भारताचा युवा बॅटर अभिषेक शर्माचा नंबर लागतो. घरच्या मैदानावर रंगणाऱ्या सामन्यात या दोघांकडून दमदार खेळीची अपेक्षा असेल.