आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्सच्या संघानं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. शार्दुल ठाकूरच्या भेदक माऱ्याच्या जोरावर धडाकेबाज फलंदाजीसह हवा काढत आधी लखनौच्या संघानं ३०० पारची हवा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला १९० धावांवर रोखले. त्यानंतर १९१ धावांचा पाठलाग करत सामना खिशात घातला. सनरायझर्स हैदराबादतच्या संघाने दिलेल्या १९१ धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जाएंट्स संघाची सुरुवात खराब झाली. पण त्यानंतर मिचेल मार्शच अर्धशतक ५२ (३१) आणि निकोल पूरन याच्या २६ चेंडूतील ७० धावांच्या वादळी खेळीसह लखनौच्या नवाबांनी ५ विकेट राखून १६ व्या षटकातील पहिल्याच चेडूवर सामना जिंकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शार्दुल ठाकूरनं मोडला हैदराबादी स्फोटक फलंदाजांचा कणासनरायझर्स हैदराबादच्या संघ आपल्या ताफ्यातील फलंदाजांच्या जोरावर यंदाच्या हंगामात ३०० पार धावा करु शकेल, अशी चर्चा सध्या चांगलीच रंगताना दिसत आहे. पण शार्दुल ठाकूरसह लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातील गोलंदाजांसमोर एकाही स्फोटक फलंदाजाला धमाका करता आला नाही. ट्रॅविस हेडनं २६ चेंडूत केलेल्या ४७ धावा ही या ताफ्यातील फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. दुसऱ्या बाजूला लखनौच्या ताफ्यातून शार्दुल ठाकुरनं सर्वाधिक ४ विकेट्स लक्षवेधी कामगिरी केली. पहिल्या स्पेलमध्ये त्याने एकाच षटकात अभिषेक शर्मा आणि इशान किशनला स्वस्तात माघारी धाडत सनरायझर्स हैदराबादच्या बॅटिंगचा रुबाबच नाहीसा केला. त्याच्याशिवाय आवेश खान, दिग्वेश राठी, रवी बिश्नोई आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
सनरायझर्स हैदराबादच्या संघानं सेट केलं होतं १९१ धावांचं टार्गेट
ट्रॅविस हेडशिवाय नितीश कुमार रेड्डीनं २८ चेंडूत २६ धावा केल्या. क्लासेन १७ चेंडूत २६ धावा करून रनआउट झाला. अंकित वर्मानं १३ चेंडूत ३६ धावा केल्यावर तळाच्या फलंदाजाीतल कर्णधार पॅट कमिन्स याने ४ चेंडूत केलेल्या ४ चेंडूत ३ षटकाराच्या मदतीने १८ धावा केल्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारत लखनौ संघासमोर १९१ धावांचे टार्गेट सेट केले होते.
निकोलस पूरनसह मिचेल मार्शचा हिट शो जारी...
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्शनं ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने यंदाच्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात दुसरे अर्धशतक झळकावले. याशिवाय निकोलस पूरन यानेही २६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने केलेल्या ७० धावा कुटत सलग दुसऱ्या अर्धशतकाला गवसणी घातली. रिषभ पंत १५ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. अयुष बडोनी याने ६ धावा करून तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर डेविड मिलरनं ७ चेंडूत नाबाद १३ धावा आणि अब्दुल समदनं ८ चेंडूत केलेल्या २२ धावांसह लखनौनं पहिला विजय साकार केला.