SRH Beats KKR Harsh Dubey Impressed With His Bowling : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून आउट झालेल्या गत उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातील विजयासह यंदाच्या हंगामाचा शेवट गोड केला. ट्रॅविस हेडच्या स्फोटक अर्धशतकी खेळीनंतर क्लासेनच्या भात्यातून आलेल्या विक्रमी आणि नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ १९ व्या षटकातच १६८ धावांवर आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सनरायझर्स हैदराबादचा मोठा विजय
दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यावर गोलंदाजांनीही सर्वोत्तम कामगिरी करून दाखत संघाला ११० धावांनी मोठा विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा मोठा विजय आहे. याआधी २०१९ च्या हंगामात आरसीबी विरुद्ध त्यांनी ११८ धावांनी सामना जिंकला होता.
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
हैदराबादकडून गोलंदाजीत तिघांचा जलवा
हैदराबादने सेट केलेल्या डोंगराएवढ्या टार्गेटचा पाठलाग करताना कोलकाता संघातील जवळपास सर्वच फलंदाजांनी नांगी टाकली. सलामीवीर सुनील नरेन याने १६ चेंडूत केलेल्या ३१ धावा आणि लोअर मिडल ऑर्डरमध्ये मनिष पांडे ३७ (२३) आणि तळाच्या फलंदाजीत हर्षित राणाने ३४ (२१) केलेल्या धावांच्या जोरावर संघाने रडत खडत १६८ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून जयदेव उनादकट. इशान मलिंग आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.
विदर्भकर हर्ष दुबेची हॅटट्रिक हुकली, पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
आयपीएलमध्ये तिसरा सामना खेळणाऱ्या विदर्भकर हर्ष दुबेनं अखेरच्या सामन्यात हैदराबाद संघाकडून खास छाप सोडली. वाइल्ड कार्डनं सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात सामील झालेल्या २२ वर्षीय युवा डावखुऱ्या फिरकीपटूने पहिल्या दोन सामन्यात प्रत्येकी १-१ विकेट घेतली होती. कोलकाता विरुद्ध तो हॅटट्रिकवर पोहचला होता. रिंकू सिंगला आपल्या जाळ्यात अडकवल्यावर त्याने मसल पॉवर रसेलला खातेही न उघडता तंबूत धाडले. त्याला हॅटट्रिकचा डाव साधता आला नाही. पण ४ षटकात ३४ धावा खर्च करून त्याने आगामी हंगामासाठी ऑरेंज आर्मीकडून आपली जागा जवळपास बूक केलीये. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळताना रणजीच्या एका हंगामात ६९ विकेट्स घेणारा हा युवा फिरकीपटू इंग्लंड दौऱ्यावर भारत 'अ' संघाचा भाग आहे. या दौऱ्याआधी आयपीएलमध्ये मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं करून दाखवलंय.
Web Title: IPL 2025 SRH vs KKR Sunrisers Hyderabad beats Kolkata Knight Riders by 110 Runs Harsh Dubey Impressed With His Bowling After Klaasen And Head Hit Show
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.