IPL 2025 SRH vs DC Sunrisers Hyderabad Have Been Eliminated : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीसमोर दिल्लीकरांनी अक्षरश: नांगी टाकली. पण पहिला डाव झाल्यावर पावसाने बॅटिंग केल्यामुळे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाच्या बॉलिंगवर पाणी फेरले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रंद्द झाला अन् फक्त बॉलिंग करून सनरायझर्स हैदराबाद संघावर प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट होण्याची वेळ आली. प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हैदराबादसाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पण पावासामुळे सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. हा एक गुण मिळवून उर्वरित सर्व सामने जिंकले तरी हैदहाबादचा संघ फक्त १३ गुणांपर्यंतच पोहचू शकत असल्यामुळे गत उपविजेत्या संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२९ धावांत दिल्लीचा अर्धा संघ परतला होता तंबूत
'करो वा मरो' अशा लढतीत नाणेफेक जिंकून पॅट कमिन्स याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्वत: पुढाकार घेत कॅप्टनने दिल्लीच्या बॅटिंग ऑर्डरला सुरुंग लावला. पॉवर प्लेमध्ये त्याने ३ षटकात ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय जयदेव उनाडकट आणि हर्षल पटेलनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवत अवघ्या २९ धावांवर दिल्लीचा अर्धा संघ तंबूत धाडला होता.
स्टब्स अन् आशुतोष शर्मानं सावरला दिल्लीचा डाव
आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर ट्रिस्टन स्टब्स याने ३६ चेंडूत केलेल्या ४१ धावांची नाबाद खेळी आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात येऊन आशुतोष शर्मा याने २६ चेंजूत केलेल्या ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात १३३ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून पॅट कमिन्सच्या सर्वाधिक ३ विकेटशिवाय उनादकट, हर्षल पटेल आणि एशान मलिंगा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या. ही मॅच जिंकून हैदराबादसमोर प्लेऑफ्सच्या शर्यतीतील टिकून राहण्याचे आव्हान होते. पण पावसामुळे दुसऱ्या डावातील खेळच झाला नाही. परिणामी दमदार गोलंदाजी करूनही बॅटिंग न करता हैदराबादचा यंदाच्या स्पर्धेतील प्रवास इथेच संपुष्टात आला. दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्सला मोठा दिलासा मिळाला. या सामन्यातील एका गुणांसह त्यांच्या खात्यात आता १३ गुण जमा झाले आहेत. जर तरच्या समीकरणात न अडकता प्लेऑफ्समधील आपले स्थान पक्के करण्यासाठी आता त्यांना उर्वरित ३ सामन्यातील दोन सामने जिंकावे लागतील.