आयपीएल २०२५ मधील चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास खूपच निराशाजनक ठरला. यंदाच्या हंगामात चेन्नईला आतापर्यंत खेळलेल्या १३ पैकी १० सामन्यांमध्ये पराभव पत्करला लागला. दरम्यान, मंगळवारी खेळण्यात आलेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही चेन्नईला पराभवाचे तोंड पाहावे लागले. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १७ चेंडूत १६ धावा केल्या. सीएसकेच्या पराभवानंतर माजी भारतीय प्रशिक्षक संजय बांगर यांनी धोनीच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.
आरसीबीचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले की, जर मी एमएस धोनीच्या जागी असतो तर आता पुरे झाले असे म्हटले असते. मला जे खेळायचे होते ते मी खेळलो. ईएसपीएन क्रिकइन्फो टाइम आउट शोमध्ये माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि संजय बांगर यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या भविष्याबद्दल आपले मत मांडले.
एमएस धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा करताना संजय बांगर म्हणाले की, "४३ वर्षांच्या वयात अशा स्पर्धात्मक वातावरणात खेळणे खूप कठीण आहे. जर मी धोनीच्या जागी असतो तर मी म्हटले असते की आता पुरे झाले. मला जे खेळायचे होते ते मी खेळलो आहे. मी फ्रँचायझीच्या हिताची काळजी घेतली आहे, पण आता निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे."
आकाश चोप्रा यांनी सुचवले की, चेन्नईने अनेक मोठ्या खेळाडूंना सोडले पाहिजे. त्याच्या यादीत रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉन्वे, विजय शंकर, दीपक हुडा आणि राहुल त्रिपाठी यांच्या नावांचा समावेश आहे. चोप्रा म्हणाले की, जडेजाऐवजी डेवॉल्ड ब्रेव्हिसने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. संघाला एका आक्रमक टॉप-ऑर्डर फलंदाजाची आणि एका फिनिशरची आवश्यकता आहे. याशिवाय, नूर अहमद आणि मथिशा पाथिराणा सारख्या गोलंदाजांना कायम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.
धोनीची आयपीएलमधील कामगिरीधोनीने आयपीएल २०२५ मध्ये खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये २४.५० च्या सरासरीने आणि १३५.१७ च्या स्ट्राईक रेटने १९६ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३० धावा आहे.