MS Dhoni Riyan Parag, IPL 2025 RR vs CSK: यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिल्यानंतर चेन्नई एक्सप्रेस 'डिरेल' झाली. रविवारी CSKचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. राजस्थानच्या संघाने चेन्नईचा शेवटच्या षटकात पराभव केला. नितीश राणाच्या ८१ धावांच्या जोरावर राजस्थानने १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात CSK ला २० षटकांत १७६ धावाच करता आल्या. शेवटच्या षटकात चेन्नईला २० धावांची गरज होती पण त्यांना सहा धावा कमीच पडल्या. मैदानात धोनी आणि जाडेजा हे दोन अनुभवी फलंदाज असताना राजस्थानवर दडपण होते. पण त्याच वेळी राजस्थानचा नवखा कर्णधार रियान पराग याने हुशारीने एक डाव टाकला आणि राजस्थानला विजय मिळाला.
१८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतक ठोकले. त्याने ४४ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार खेचून ६३ धावा केल्या. तो १६व्या षटकात बाद झाला. त्यानंतर रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनी या जोडीने चेन्नईला विजयी करण्यासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. अखेरच्या षटकात CSKला २० धावांची गरज होती, धोनी स्ट्राईकवर होता, तरीही कर्णधार रियान परागने राजस्थानसाठी असा मास्टर स्ट्रोक खेळला की धोनीची जादुची चालू शकली नाही.
काय होता रियान परागचा 'मास्टरस्ट्रोक'?
रियान परागने राजस्थानसाठी शेवटचे षटक संदीप शर्माकडे सोपवले. संघाकडे जोफ्रा आर्चरचा पर्यायही होता. सीएसके विरुद्धच्या या सामन्यात आर्चरने पहिल्या तीन षटकांत शानदार गोलंदाजीदेखील केली होती. त्याने तीन षटकांच्या स्पेलमध्ये एका मेडन ओव्हरसह फक्त १३ धावा दिल्या होत्या आणि १ विकेटही घेतली होती. पण धोनी-जाडेजा दोघेही अनुभवी होते, आर्चरच्या वेगवान माऱ्यापुढे ते फारसे घाबरले नसते. रियान परागने संदीपची निवड केली. कारण तो वेगवान चेंडूंसोबतच स्लो चेंडूही टाकू शकतो. तो गोलंदाजीत चांगले मिश्रण करतो. त्याने धोनीची विकेट घेत त्याची उपयुक्तता सिद्धदेखील केली.
शेवटच्या टप्प्यात मोठे फटके मारण्याची क्षमता असलेल्या धोनीला संदीप शर्माने स्लोवर बॉल टाकून पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. त्यानंतर त्याने एक षटकार खाल्ला. पण त्याने फारसा दबाव निर्माण होऊ शकला नाही. अखेर राजस्थानने सहा धावांनी सामना जिंकला.
Web Title: IPL 2025 RR vs CSK Riyan Parag master stoke giving last over to sandeep sharma when ms dhoni ravindra jadeja batting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.