Riyan Parag, IPL 2025 RR vs CSK: राजस्थान रॉयल्सच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करत अखेर रविवारी यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. नितीश राणाच्या ८१ धावांच्या जोरावर राजस्थानने १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात CSK ला २० षटकांत १७६ धावाच करता आल्या आणि RR ने ६ धावांनी निसटता विजय मिळवला. संजू सॅमसन अनफिट असल्याने, रियान परागला तीन सामन्यांचा कर्णधार बनवण्यात आले होते. पहिले दोन सामने त्याने गमावले पण शेवटच्या सामन्यात विजय मिळाल्याने त्याला दिलासा मिळाला. असे असूनही रियान परागला एका चुकीमुळे तब्बल १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राजस्थानचा हंगामी कर्णधार रियान पराग याच्यावर दंड ठोठवला. राजस्थानच्या गोलंदाजीच्या वेळी षटकांची गती कमी राखल्याने त्याच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. निर्धारित वेळेत संघाने २० षटके न टाकल्यामुळे IPL च्या नियमावलीनुसार ही कारवाई केली गेली. रियान परागचा कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना होता. पण जर काही कारणास्तव त्याने कर्णधार म्हणून पुन्हा अशी चूक केली तर दंडाची रक्कम वाढत जाईल. यंदाच्या हंगामात अशी चूक करणारा रियान पराग दुसरा कर्णधार ठरला. त्याआधी मुंबईच्या हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सविरूद्ध हीच चूक केली होती.
दरम्यान, सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना दमदार खेळी केली. डावखुरा नितीश राणा याने अप्रतिम फलंदाजी केले. ३६ चेंडूत त्याने दणकेबाज ८१ धावा कुटल्या. कर्णधार रियान परागनेही ३७ धावांची खेळी केली. या दोन खेळींच्या बळावरच राजस्थानने १८२ धावांची मजल मारली. चेन्नईच्या पाथिराना, नूर अहमद, खलीलने २-२ बळी घेतले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना कर्णधार ऋतुराजने ६३ धावांची खेळी केली. जाडेजाने नाबाद ३२ धावा केल्या. पण अखेर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले आणि CSKला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
Web Title: IPL 2025 RR vs CSK Rajasthan Royals Captain Riyan Parag fined Rs 12 lakhs as BCCI slams him for slow over rate
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.