Vaibhav Suryavnshi Big Record, IPL 2025: राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. अवघ्या १४व्या वर्षी त्याने सर्वात स्पर्धात्मक समजल्या जाणाऱ्या IPL मध्ये पदार्पण केले आणि आपला ठसा उमटवला. प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या गुजरात टायटन्स संघाविरोधात वैभव सूर्यवंशीने दणकेबाज शतक ठोकले होते. तसेच इतरही सामन्यात सलामीला येत त्याने दमदार फटकेबाजी दाखवून दिली होती. त्याच्या याच फटकेबाजीच्या जोरावर त्याला जगातील ५८ फलंदाजांमध्ये सर्वोत्तम ठरण्याचा मान मिळाला आहे. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी ५८ फलंदाजांमध्ये आपल्या वर्चस्व राखून नंबर १ बनला आहे. वैभवने हा पराक्रम कुठे आणि ते फलंदाज कोण याबद्दल जाणून घेऊया.
'या' ५८ फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशीची नंबर १
वैभव सूर्यवंशी ज्या ५८ फलंदाजांच्या यादीत अव्वल ठरला ते कोण आहेत असा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. ते सर्व फलंदाज आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी करून चमकले आहेत. ५८ खेळाडू ही IPL मध्ये आतापर्यंत शतके ठोकणाऱ्या फलंदाजांची संख्या आहे. आणि या यादीत सर्व फलंदाजांमध्ये वैभव सूर्यवंशी पहिल्या क्रमांकावर आहे.
![]()
कोणत्या बाबतीत ठरला 'नंबर १'
५८ फलंदाजांमध्ये वैभव सूर्यवंशी ज्या गोष्टीमुळे वेगळा ठरलाय, ते म्हणजे त्याच्या शतकातील चौकार-षटकारांची टक्केवारी. १४ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले. वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध २६५.७८च्या स्ट्राईक रेटने ३८ चेंडूत १०१ धावा केल्या, ज्यामध्ये ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. म्हणजेच त्याने त्याच्या शतकात फक्त चौकार-षटकारांच्या मदतीने ९४ धावा केल्या.
वैभवने मोडला यशस्वी जैस्वालचा विक्रम
जर चौकार षटकारांच्या टक्केवारीची गोष्ट केली तर वैभव सूर्यवंशीने त्याच्या शतकादरम्यान त्याच्या ९३ टक्के धावा फक्त चौकार आणि षटकार मारून केल्या, जो एक विक्रम आहे. वैभव सूर्यवंशीने या बाबतीत त्याचाच संघातील सहकारी आणि सलामीचा जोडीदार यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडला आहे. २०२३ च्या आयपीएलमध्ये जेव्हा यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते तेव्हा त्याच्या ९० टक्के धावा चौकार-षटकारांनी झाल्या होत्या.
या यादीत वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांच्यानंतर श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या तिसऱ्या, तर अडम गिलख्रिस्ट चौथ्या स्थानी आहे.
Web Title: IPL 2025 RR Opener Vaibhav Suryavanshi becomes number 1 among 58 IPL centurions highest boundary percentage
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.