IPL 2025 RCB vs GT Mohammed Siraj : मोहम्मद सिराजसाठी यंदाच्या हंगामातील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धचा सामना एकदम खास होता. कारण ज्या आरसीबीच्या संघाकडून त्याची कारकिर्द बहरली त्या संघाविरुद्ध तो गुजरात टायटन्स कडून मैदानात उतरला होता. सामन्याआधी त्याने आरसीबी विरुद्ध खेळणं हा एक भावनिक क्षण असल्याचे बोलून दाखवले. पण मैदानात उतरल्यावर भावना बाजूला ठेवून सर्वोत्तम कामगिरीवर फोकस असेल, यावरही त्याने जोर दिला. जे बोलला ते त्यानं करूनही दाखवलं. गुजरात टायटन्सच्या संघाकडून त्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. यात सॉल्टची विकेट एकदम सॉलिड होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सिराजचा भेदक मारा; पहिल्या षटकात विकेट हुकली, लगेच दुसऱ्या षटकात साधला डाव
खरं तर पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजनं सॉल्टचा करेक्ट कार्यक्रम केलाच होता. पण जोस बटलरनं विकेट मागे एक सोपा झेल सुटला अन् गिलनं स्लिपमध्ये केलेल्या सेलिब्रेशनसह सिराजच्या पदरी निराशा आली. पण ही संधी गमावल्यावर सिराज फार काळ विकेट लेस राहिला नाही. आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात देवदत्त पडिक्कलचा त्रिफळा उडवत त्याने पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. एका बाजूला अर्शद खानने विराट कोहलीला माघारी धाडून आरसीबीला बॅकफूटवर ढकलले होते. सामन्यावरील पकड मजबूत करण्यासाठी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने सिराजला दोन षटके टाकून न थांबवता पॉवर प्लेमध्येच सिराजला तिसरी ओव्हरही दिली. अन् या षटकात त्याने पॉवरही दाखवली.
IPL 2025: MS धोनीच्या विकेटनंतर राग व्यक्त करणारी 'ती' मिस्ट्री गर्ल सापडली! जाणून घ्या कोण?
१०५ मीटर लांब षटकार मारणाऱ्या सॉल्टचा पुढच्याच चेंडूवर घेतला बदला
आरसीबीच्या डावातील पाचव्या षटकात सिराज आपलं वैयक्तिक तिसरे षटक घेऊन आला. या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर त्याने प्रत्येकी एक-एक धाव खर्च केली. तिसऱ्या चेंडूवर फिल सॉल्टनं १०५ मीटर लांब षटकार मारून रुबाब झाडला. यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार मारणाऱ्या ट्रॅविस हेडची त्याने बरोबरी केली. पण सिराजनं पुढच्याच चेंडूवर आपली ताकद दाखवून दिली. सिराजनं १४४ Kph वेगाने टाकलेल्या स्विंग चेंडूवर सॉल्टचा करेक्ट कार्यक्रम केला. पहिल्या ३ षटकांच्या स्पेलमध्ये सिराजनं १५ धावा खर्च करून २ महत्त्वपूर्ण विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
RCB विरुद्धच्या सामन्यात GT कडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला सिराज
डेथ ओव्हरमध्ये अखेरचे षटक घेऊन आल्यावर आरसीबीचा डाव सावरणाऱ्या लायम लिविंगस्टोनलाही सिराजनेच तंबूत धाडले. या विकेटसह मोहम्मद सिराजनं आरसीबी विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात १९ धावा खर्च करून संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेत आरसीबीची अवस्था बिकट करण्यात मोलाचा वाटा उचलला.