रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानात रंगलेल्या २०० पारच्या लढाईत चेन्नई सुपर किंग्जला रोखून दाखवले. या सामन्यातील विजयासह RCB च्या संघाने १६ गुण आपल्या खात्यात जमा करत प्लेऑफ्सचं आपलं तिकिट जवळपास पक्के केले आहे. अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना रजत पाटीदार याने यश दयालच्या हाती चेंडू सोपवला. मॅच फिनिशर महेंद्रसिंह धोनी आणि सेट झालेला जडेजा क्रिजवर होते. पण अखेरच्या षटकात मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा अन् मॅच फिनिशरच्या रुपात ओळखला जाणारा धोनी यश दयालसमोर फिका ठरला. धोनी बाद झाल्यावर सामन्यात नो बॉलच ट्विस्ट आलं. परिणामी शेवटच्या ३ चेंडूत ६ धावा उरल्या होत्या. पण यश दयालनं उर्वरित ३ चेंडूत फक्त ३ धावा खर्च करत संघाला २ धावांनी विजय मिळवून दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
CSK च्या संघाला ३ चेंडूत ६ धावा नाही काढता आल्या
पहिल्या दोन चेंडूवर यश दयालनं धोनीसह जडेजाला मोठा फटका मारण्यापासून रोखलं. या दोन चेंडूवर फक्त दोन धावा आल्या. ४ चेंडूत १३ धावांची गरज असताना महेंद्रसिह धोनी पायचित झाला. ३ चेंडूत १३ धावांची गरज असताना धोनीची जागा घेण्यासाठी आलेल्या शिवम दुबेनं षटकार मारला अन् सामन्यात पुन्हा ट्विस्ट आले. रिव्ह्यूच्या मदतीनो तो चेंडू नो बॉल ठरल्यावर CSK च्या संघाला अखेरच्या ३ चेंडूत ६ धावा उरल्या होत्या. पण त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत यश दयालनं हातून निसटतोय असे वाटणारा सामना संघाच्या बाजूनं फिरवला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच RCB च्या संघाने एका हंगामात दोन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले आहे.