रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात डेवॉल्ड ब्रेविसच्या विकेट चर्चेचा विषय ठरत आहे. आयुष म्हात्रे ९४ धावांवर बाद झाल्यावर डेवॉल्ड ब्रेविस मैदानात उतरला. लुंगी एनिग्डीच्या गोलंदाजीवर पायचित होऊन त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. रिप्लेमध्ये तो नॉट आउट असल्याचे दिसत होते. त्याने आपली विकेट वाचवण्यासाठी DRS चा इशाराही केला. पण पंचांनी वेळ संपल्याचे सांगत त्याला आउट ठरवले. त्याच्यावर गोल्डन डकची नामुष्की ओढावली. एवढेच नाही तर या निर्णयामुळेच CSK आणखी फसली, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसते. इथं जाणून घेऊयात नेमकं काय घडलं? अंपायर चुकला की, CSK ला बॅटरची चूक नडली? त्यासंदर्भातील स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्जच्या १७ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेवॉल्ड ब्रेविस बॅटिंगसाठी मैदानात आला. पहिलाच चेंडू खेळताना तो चुकला. बॅटचा संपर्क न होता चेंडू पॅडवर आदळला. लुंगी एनिग्डीसह RCB च्या संघातील खेळाडूंनी जोरदार अपील केली अन् मैदानातील पंचांनी बोटवर करत फलंदाजाला बाद दिले. हे सगळ घडतं असताना जड्डू आणि ब्रेविस धाव काढण्यात मग्न दिसले. धाव पूर्ण केल्यावर ब्रेविसनं जड्डूसोबत चर्चा करत DRS चा निर्णय घेतला. पण तोपर्यंत DRS ची निर्धारित वेळ संपली होती. त्यामुळे आपला निर्णय कायम ठेवत बॅटरला बाद ठरवले.
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
जड्डूनं हुज्जत घातली, पण त्याचा काही उपयोग नाही झाला
रिव्ह्यूचा विचार व्हावा यासाठी जडेजाने मैदानातील पंचांशी हुज्जतही घातली. पण मैदानातील पंचावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. नियमाचा दाखला देत त्यांनी बॅटरला आउट दिले. दक्षिण आफ्रिकेचा बेबी एबीला निराश होऊन तंबूत परतावे लागले. रिप्ले पाहिल्यावर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता असे दिसून आले. अर्थात रिव्ह्यू घेऊन विकेट वाचवणे शक्य झाले असते. पण वेळ न पाळल्यामुळे CSK नं एक विकेट फुकट गमावली. ही विकेट वाचली असती तर कदाचित मॅचचा रिझल्टही वेगळा लागला असता.
नेमकी चूक कुणाची? अंपायर की फलंदाज
डेवॉल्ड ब्रेविसला आउट दिले तो निर्णय चुकीचा होता, असे रिप्लेमध्ये स्पष्ट होते. पण पंचाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी DRS घेण्यासंदर्भातील वेळेचे फलंदाजांकडून पालन झाले नाही. नियमानुसार अंपायरने आपला निर्णय दिल्यावर १५ सेकंदाच्या आत बॅटरनं रिव्ह्यू घ्यावा लागतो. डेवॉल्ड ब्रेविस आणि जडेजा आउट दिल्यावरही धावा काढताना दिसले. यात त्यांचा वेळ गेला. मैदानातील पंचांनी पायचित दिलेला निर्णय वादग्रस्त असला तरी तो निर्णय कामय ठेवणे हे नियमानुसारच आहे. याशिवाय बिग स्क्रिनवर टायमर का दिसला नाही तोही चर्चेचा मुद्दा ठरतोय.