Join us

रेकॉर्डब्रेक विजयासह RCB ने IPLमध्ये रचला खास विक्रम, अशी कामगिरी मुंबई, चेन्नईलाही जमलेली नाही

IPL 2025, LSG Vs RCB: यंदाच्या आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध तब्बल २२८ धावांचा यशस्वी पाठलाग करत एका विक्रमी विजयाची नोंद केली. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या स्पर्धेत आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:10 IST

Open in App

यंदाच्या आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध तब्बल २२८ धावांचा यशस्वी पाठलाग करत एका विक्रमी विजयाची नोंद केली. तसेच बंगळुरूने गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावत क्वालिफायर १ चं तिकिटही पक्कं केलं. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या स्पर्धेत आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.

आयपीएलमध्ये बऱ्याच वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हा पहिल्या दोन क्रमांकावर राहत क्वालिफायर १ साठी पात्र ठरला आहे. त्याबरोबरच बंगळुरूने केलेला खास विक्रम म्हणजे यंदाच्या हंगामात बंगळुरूने साळखी फेरीमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा बंगळुरू हा पहिला संघ ठरला आहे. याआधी अशी कामगिरी कुठल्याही संघाला करता आलेली नाही  नाही म्हणायला २०१२ मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईटरायडर्स यांनी प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानात खेळलेले ७ सामने जिंकले होते. मात्र त्यावेळी संघांची संख्या अधिक होती. तसेच प्रत्येक संघ ८ सामने विरोधी संघाच्या मैदानात खेळत असे.

या लढतीत लखनौ सुपरजायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंत याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर २० षटकांमध्ये २२७ धावा कुटल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र एकापाठोपाठ एक फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने बंगळुरूचा डाव अडखळला. विराट कोहली बाद झाला तेव्हा बंगळुरूला विजयासाठी ५२ चेंडूत १०५ धावांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत या सामन्यात कप्तानी करत असलेल्या जितेश शर्मा याने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली.

३३ चेंडूत ८५ धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या जितेश शर्माने मयांक अग्रवालसोबत पाचव्या विकेटसाठी अभेद्य १०७ धावांची भागीदारी करत १९व्या षटकातच बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यासोबतच १४ सामन्यात १९ गुणांसह बंगळुरूच्या संघाने गुणतक्क्यात दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे आता गुरुवारी होणाऱ्या क्वालिफायर १ मध्ये बंगळुरूची गाठ अव्वलस्थानी असलेल्या पंजाब किंग्सच्या संघाशी पडणार आहे.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर