आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. राजस्थानचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. राजस्थानला चालू हंगामातील उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. त्याआधी राजस्थानने संघात बदल केला आहे. संघाचा फलंदाज नितीश राणाच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या स्टार ऑलराऊंडरला संघात सामील केले. नितीश राणाला दुखापत झाल्याने तो राजस्थानकडून पुढील दोन सामने खेळू शकणार नाही, असे सांगण्यात आले.
दुखापतीमुळे नितीश राणा ४ मे रोजी झालेल्या राजस्थान विरुद्ध कोलकाता सामन्यात खेळू शकला नाही. हा सामना राजस्थानने अवघ्या एका धावाने गमावला. या हंगामात नितीश राणाने ११ सामन्यांमध्ये २१.७० च्या सरासरीने आणि १६१.९४ च्या स्ट्राईक रेटने २१७ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा १९ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज लुआन-ड्रे प्रिटोरियसला करारबद्ध केले. राजस्थानने त्याला ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात समाविष्ट केले.
लुआन-ड्रे प्रिटोरियसची टी-२० कारकिर्द
लुआन-ड्रे प्रिटोरियसने ३३ टी-२० सामने खेळले आहेत आणि ९११ धावा केल्या. प्रिटोरियसने ५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३६ धावा आणि १४ लिस्ट ए सामन्यांमध्ये ५७७ धावा केल्या आहेत. प्रिटोरियसने जानेवारी २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये पार्ल रॉयल्सकडून पदार्पण केले. त्याने पार्ल रॉयल्सकडून १२ सामन्यांमध्ये ३३.०८ च्या सरासरीने आणि १६६.८० च्या स्ट्राईक रेटने ३९७ धावा केल्या. प्रिटोरियसची चमकदार कामगिरी पाहून हॅम्पशायर काउंटी क्रिकेट क्लबने फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याला करारबद्ध केले.
गुणतालिकेत राजस्थान नवव्या स्थानावर
राजस्थान रॉयल्स संघ ६ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. या हंगामात संघाला १२ पैकी फक्त ३ सामने जिंकता आले आहेत. तर ९ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानला उर्वरित २ सामने जिंकून आपल्या स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल.
Web Title: IPL 2025: Rajasthan's new move, South Africa's deadly batsman called up for the remaining matches!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.