IPL 2025 Playoffs Players Availability: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे स्थगित केलेली IPL स्पर्धा पुन्हा सुरू होत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावामुळे ९ मे रोजी ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता परिस्थिती सुधारल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेचा उर्वरित भाग १७ मे पासून आयोजित करण्याची घोषणा केली आहे. परंतु बदललेल्या वेळापत्रकामुळे, काही खेळाडू परत येणार नाहीत, असे सांगितले जात आहे. याचा मोठा फटका दिल्ली कॅपिटल्सला बसणार आहे. त्यांचे दोन खेळाडू परतणार नसल्याचे सांगितले जात आहे.
IPL 2025 चा हंगाम २५ मे संपणार होता. पण भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे तो एका आठवड्यासाठी थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता स्पर्धा पुन्हा सुरू होत आहे आणि नवीन वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार हंगामाचा अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. परंतु या बदललेल्या वेळापत्रकाचा परिणाम परदेशी खेळाडूंवर होत आहे. बरेच जण त्यांच्या देशात परतले आहेत आणि आता विविध कारणांमुळे परतण्यास तयार नाहीत.
दिल्ली कॅपिटल्सला धक्के
या यादीत ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांची नावे आधीच आली आहेत. हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे, तर स्टार्क दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित आहे. दिल्ली कॅपिटल्सला आता आणखी एक धक्का बसला आहे. कारण स्टार्कनंतर संघाचा तरुण ऑस्ट्रेलियन सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्क देखील परतत नाहीये. ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, मॅकगर्कने फ्रँचायझीला कळवले आहे की तो स्पर्धेत परतणार नाही.
मॅकगर्क बेंचवरच, पण तरीही फरक पडणार...
या हंगामात मॅकगर्कची कामगिरी चांगली नव्हती आणि सुरुवातीचे सामने खेळल्यानंतर तो बेंचवरच बसला. पण तरीही परदेशी खेळाडूची कमतरता दिल्ली कॅपिटल्ससाठी समस्या निर्माण करू शकते. मेगा लिलावात दिल्लीने मॅकगर्कला ९ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण तो या हंगामात प्रभाव पाडू शकला नाही. त्याला या हंगामातील पहिल्या ६ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली पण तो फक्त ५५ धावा करू शकला, त्यापैकी ५ डावांमध्ये तो एक अंकी धावसंख्येवर बाद झाला.
आफ्रिकन खेळाडूंबाबतही साशंकता
केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या सहभागाबद्दलही शंका आहेत. दक्षिण आफ्रिकेला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे, तर इंग्लंडला वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत, मार्को जॅन्सन, ट्रिस्टन स्टब्स, जोस बटलर, विल जॅक्स, जेकब बेथेल सारखे खेळाडू उर्वरित सर्व सामने खेळण्याची शक्यता कमी आहे.