आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असतान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेसाठी काही नवीन नियम जारी केले. स्पर्धेच्या पुढील सामन्यांसाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवण्यात आला. पावसाच्या शक्यतेमुळे हा बदल करण्यात आला.
दरम्यान, आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना (१७ मे २०२५) पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर बीसीसीआयने निर्णयात बदल केला. यापुढे आयपीएलच्या पुढील सामन्यात पावसाने व्यत्यय आणले तर हा सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवून दिला जाईल.
सीएसके विरुद्ध आरआर सामन्यानंतर लीग टप्प्यात एकूण ८ सामने शिल्लक राहतील, यातील ७ सामने संध्याकाळी खेळवले जातील. नियमांनुसार, दुपारी खेळला जाणारा सामना संध्याकाळी ६:५० वाजता संपला पाहिजे. तर संध्याकाळी सुरू होणारा सामना रात्री १०:५० वाजता संपला पाहिजे. नवीन नियमांनुसार, दुपारी सुरू होणारा सामना संध्याकाळी ५:३० वाजता सुरू झाला तर एकही षटक कापले जाणार नाही. संध्याकाळी होणारा सामना रात्री ९:३० सुरू झाल्यास सामना एकही षटक कापले जाणार नाही.
सहसा २ तासांचा अतिरिक्त वेळ नियम फक्त प्लेऑफ सामन्यांसाठी लागू केला जातो. पावसाच्या शक्यतेमुळे लीग सामन्यांनाही अतिरिक्त वेळेचा नियम लागू करण्यात आला. आयपीएल २०२५ मधील आतापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द झाले.