Join us

KKR विरुद्धच्या सलामीच्या लढतीत विराटपेक्षा RCB च्या ताफ्यातील या खेळाडूवर असतील सर्वांच्या नजरा

फलंदाजीतील कर्तृत्वासह त्याला नेतृत्वाची धमक दाखवून दुहेरी भूमिका पार पाडण्याचे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:43 IST

Open in App

यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या १८ व्या हंगामातील सलामीच्या लढतीत रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहे. २२ मार्चला ईडन गार्डन्सच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येईल. रॉयल चॅलेंजर्स सघ म्हटलं की, विराट कोहली केंद्रस्थानी असणारच. पण सलामीच्या लढतीतसह एकंदरीत स्पर्धेत रजत पाटीदार हा  देखील लक्षवेधी चेहरा ठरू शकतो. विराट कोहली संघात असताना आरसीबीच्या संघानं त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवलीये. तो आघाडीच्या फलंदाजीतील प्रमुख खेळाडू आहे. संघाला पहिली ट्रॉफी जिंकून देण्यासाठी फलंदाजीतील कर्तृत्वासह त्याला नेतृत्वाची धमक दाखवून दुहेरी भूमिका पार पाडण्याचे चॅलेंज आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! आघाडीच्या फलंदाजीतील प्रमुख फलंदाज, मोठी खेळी करण्याचीही क्षमता

२०२१ मध्ये RCB संघाकडून पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदार पहिल्या हंगामात फक्त ४ सामने खेळला. पण २०२२ च्या हंगामात त्याच्या भात्यातून ८ सामन्यात ३३३ धावा आल्या होत्या. याच हंगामात त्याने ११२ धावांच्या नाबाद खेळीसह आयपीएलमधील सर्वोच्च खेळी साकारलीये. या शतकाशिवाय आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने २७ सामन्यात ७ अर्धशतासह ७९९ धावा केल्या आहेत.  

IPL आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका 

या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बंगाल विरुद्धच्या सामन्यात त्याने १३२ धावांची नाबाद खेळी केली होती. रणजी सामन्यातही केरळविरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून ९२ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. देशांतर्गत क्रिकेटमधील मागील सामन्यातील आकडेवारी ही आगामी आयपीएलमध्ये तो धमाकेदार कामगिरी करण्यासाठी तयार असल्याचा एक पुरावाच आहे.

ईडन गार्डन्सच्या मैदानातील स्फोटक अर्धशतकी खेळी

रजत पाटीदार कोलाकाता नाईट रायडर्स विरुद्ध आतापर्यंत फक्त ३ सामने खेळला आहे. यात एका अर्धशतकाच्या मदतीने त्याच्या खात्यात ५६ धावांची नोंद आहे. जमेची बाजू ही की, याआधी गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली होती. २३ चेंडूत त्याने ५२ धावांची खेळी केली होती. ही खेळी कोलकाताच्या मैदानातच आली होती. 

आरसीबीच्या ताफ्यातील असे खेळाडू जे एकहाती फिरवू शकतात सामना 

 कॅप्टन रजत पाटीदार शिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात विराट कोहली, फिल सॉल्ट, लायम लिव्हिंगस्टोन आणि क्रणाल पांड्या यांच्यासह गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड हे असे खेळाडू आहेत जे एकहाती सामना फिरवू शकतात. 

आरसीबी संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लायम लिव्हिगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेविड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीकोलकाता नाईट रायडर्स