लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: आयपीएलमध्ये लागू करण्यात आलेला ११व्या षटकातील नव्या चेंडूचा नियम सामन्यातील रोमांच आणखी वाढवेल, असे माजी क्रिकेटपटू केदार जाधव याने म्हटले आहे. केदार म्हणाला की, ११व्या षटकात नवा चेंडू आणण्याचा नियम गोलंदाजांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आला आहे. पण, काही संघांमध्ये अतिशय आक्रमक फलंदाज आहेत. ते फलंदाज नव्या चेंडूवर कसे खेळतात ते पाहणे रोमांचक असेल. कारण, अशा परिस्थितीत धावगती वाढूही शकते किंवा काही बळीही जाऊ शकतात. त्यामुळे सामन्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई आणि मुंबई हे दोन्ही संघ अतिशय तगडे आहेत. त्यामुळे त्यांनाच जेतेपदासाठी पसंती आहे, असेही केदार म्हणाला. चेन्नईच्या फलंदाजीबाबत केदार म्हणाला की, 'चेन्नईकडून डेव्हन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड सलामीला असतील, तिसऱ्या क्रमांकावर सुरेश रैनानंतर चेन्नईला आक्रमकपणे डाव पुढे नेणारा फलंदाज अद्याप मिळालेला नाही, रचिन रवींद्र शानदार फॉर्मात असून, त्याला संधी मिळायला हवी. रचिन शानदार फलंदाज असून, तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. यष्टींमागूनही धोनी संघाला विजय मिळवून देऊ शकतो.
धोनीने खेळत राहावे!
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत केदार म्हणाला की, धोनीच्या निवृत्तीबाबत काहीही सांगता येणार नाही. कारण, तो अनेकदा अनपेक्षित निर्णय घेतो. पण, त्याने निवृत्त होऊ नये, अशी आपण आशा करू शकतो. काही वर्षे त्याने भारतीय चाहत्यांना आनंद देत राहावा, असेही केदार म्हणाला.