दिल्लीत खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल यांनी पंचांशी वाद झाला. या घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुनाफवर कठोर कारवाई केली. मुनाफ पटेल यांना मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला. याचबरोबर त्यांना एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला.
बीसीसीआयच्या मते, मुनाफ पटेल यांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२० चे उल्लंघन केले आहे, जे खेळाच्या भावनेविरुद्धच्या वर्तनाशी संबंधित आहे. मुनाफ यांनी आपली चूक मान्य केली आहे आणि सामनाधिकाऱ्यांचा निर्णय मान्य केला आहे. हे लेव्हल १ चे उल्लंघन मानले जाते, ज्यामध्ये सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असतो.
नेमके प्रकरण काय?दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर काल सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान, मुनाफ पटेल हे चौथ्या पंचाशी वाद घालताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मुनाफ पटेल चौथ्या पंचाशी काहीतरी बोलताना दिसत आहेत.असे समजत आहे की, सामना सुरू असताना मुनाफ पटेल यांना मैदानातील खेळाडूपर्यंत एक मेसेज पोहोचवायचा होता. परंतु, चौथ्या पंचांनी त्यांना रोखले आणि वादाला सुरुवात झाली.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दभारताच्या २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या मुनाफन यांनी २००६ ते २०११ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. १३ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ३८.५४ च्या सरासरीने ३५ विकेट्स घेतले. तर, ७० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी ३०.२६ च्या सरासरीने ८६ विकेट्स घेतले. टी-२० क्रिकेटमध्ये त्यांना जास्त संधी मिळाली नाही. त्यांनी ३ टी-२० सामन्यात २१.५० च्या सरासरीने ४ विकेट्स घेतले.
आयपीएल कारकिर्दआयपीएलमध्ये मुनाफ यांनी राजस्थान रॉयल्स (२००८-२०१०), मुंबई इंडियन्स (२०११-२०१३) आणि गुजरात लायन्स (२०१७) या तीन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी ६३ आयपीएल सामन्यांमध्ये २२.९५ च्या सरासरीने आणि ७.५१ च्या इकॉनॉमी रेटने ७४ विकेट्स घेतले. त्यांची सर्वोत्तम आयपीएल कामगिरी ५/२१ अशी होती.