मुंबईच्या वानखेडे मैदानावर क्रिकेटचा सामना पाहायला गेलेल्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. मुंबई इडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हा प्रकार घडला. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोराचा तपास सुरू केला आहे.
नेमके काय घडले?
दक्षिण मुंबईतील एका न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुजफ्फर शेख यांनी आयफोन चोरीला गेल्याची पोलिसांत ऑनलाईन तक्रार केली. शेख आपल्या कुटुंबासोबत १७ एप्रिलला मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामना पाहण्यासाठी मुंबईतील वानखेडे मैदानावर गेले होते. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मैदानात प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शेख यांच्या खिशातील आयफोन काढून घेतला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस तपास सुरू
याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी स्टेडियममधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १७ एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स यांच्यात आयपीएलचा ३३ वा सामना खेळला गेला. हा सामना मुंबईने जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने मुंबईसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाने १६६ धावा केल्या आणि हा सामना चार विकेट्सने हा सामना जिंकला.
Web Title: IPL 2025 Mumbai Court Judges iPhone Stolen During IPL Match At Wankhede Stadium
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.