आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नई सुपरकिंजने यंदाच्या हंगामात अत्यंत खराब कामगिरी केली. चेन्नईला आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यात फक्त दोन सामने जिंकता आले. चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा जवळपास आता संपुष्टात आल्या असून त्यांना आणखी पाच सामने खेळायचे आहेत. आज चेन्नईचा संघ पंजाब किंग्जशी भिडणार आहे. या सामन्यात चेन्नईचा संघ पराभूत झाल्यास त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे कायमचे बंद होतील. या महत्त्वाच्या सामन्याआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
चेन्नई आणि पंजाब यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२५ मधील ४९ वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी धोनीचा सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत धोनी अनेक गगनचुंबी षटकार मारताना दिसत आहे. सीएसकेच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट येत आहेत.
पंजाबविरुद्धचा विजय महत्त्वाचाचेन्नईच्या संघाला त्याच्या मागील पाच सामन्यांपैकी चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईला त्यांच्या शेवटच्या सामन्यात हैदराबादकडून पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नईला पंजाबविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ तळाशी आहे. त्यांचे फक्त चार गुण आहेत.
चेन्नईची निराशाजनक कामगिरीचेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात संघाने त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर संघाने सलग तीन सामने गमावले. दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर झाला आणि पुन्हा चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी धोनीकडे सोपवण्यात आली. नेतृत्वाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धोनीसारखा कर्णधार संघाला उभारी देण्यात अपयशी ठरला. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईच्या संघाला पाच पैकी फक्त एक सामना जिंकता आला आहे.