Mohammad Siraj, IPL 2025 SRH vs GT: गुजरात टायटन्स संघाने स्फोटक फलंदाजीचा संघ मानल्या जाणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला पराभूत केले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५२ धावा केल्या. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा यांसारखे खेळाडू स्वस्तात बाद झाले. मोहम्मद सिराजने त्यांना माघारी धाडले. त्यानंतर गुजरातच्या संघाने १५३ धावांचे आव्हान सहज पार केले. मोहम्मद सिराजने ४ बळी घेऊन सामना जिंकवण्यात मोलाचा वाटा उचलला. मॅचविनिंग गोलंदाजी केल्यानंतर मोहम्मद सिराजने एक किस्सा सांगितला. त्यावेळी तो काहीसा भावनिक झाल्याचेही दिसून आले.
मोहम्मद सिराजने स्विंग गोलंदाजीचा दमदार वापर करून १७ धावांमध्ये ४ बळी घेतले. त्याला सामनवीराचा किताब देण्यात आला. त्यावेळी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळण्याच्या अनुभवाबद्दल विचारले गेले. त्यावर सिराज म्हणाला, "हैदराबाद हे माझंच घर आहे. त्यामुळे इथे खेळून आनंद झाला. मला मधल्या काळात मोठा ब्रेक मिळाला. त्याचा मला चांगला उपयोग झाला. संघातून वगळल्यानंतर मी माझ्या फिटनेस आणि मानसिक स्वास्थ्यावर खूप काम केले. जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून मला वगळ्यात आले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. तो प्रकार पचवणे मला खूपच अवघड केलं होतं. पण नंतर मी असा विचार केला की माझं क्रिकेट संपलेलं नाही. IPL वर फोकस करून मी पुढची तयारी केली आणि त्याचा मला फायदा झाल्याचे दिसतेय."
सिराजने केली मॅचविनिंग गोलंदाजी
सनरायजर्स हैदराबाद हा असा संघ आहे ज्यात खूप पॉवर हिटर्स आहेत. सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक हे दोघे पॉवर प्ले मध्ये सहज ८० पार करतात. इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी हे फलंदाजही फटकेबाजीत निष्णात आहेत. त्यामुळे या फलंदाजीसमोर भेदक मारा करणे आवश्यक होते. सिराजने ते काम केले. सर्वात आधी त्याने ट्रेव्हिस हेडला पहिल्याच ओव्हरमध्ये ८ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर अभिषेक शर्माला पॉवर प्लेमध्येच १८ धावांवर बाद केले. पुढे अनिकेत वर्मा आणि सिरमजीत सिंग या दोघांनाही सिराजने स्वस्तात तंबूत पाठवले. असे करत त्याने ४ षटकांत १७ निर्धाव चेंडू टाकले. तसेच केवळ १७ धावा देत ४ बळी घेतले. हैदराबाद संघाचा हा सलग चौथा पराभव ठरला. तर गुजरात टायटन्सने तिसरा विजय मिळवत ६ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला.