Suresh Raina on Rishabh Pant, IPL 2025 Mega Auction: यंदाच्या IPL लिलावात सर्वाधिक चर्चा होत आहेत ती म्हणजे रिषभ पंतच्या बोलीची. पंतला दिल्लीने करारमुक्त केले. त्यानंतर पंत आणि दिल्लीत काय बिनसलं याबद्दल दोघांपैकी कुणीही काहीही अधिकृत बोलले नव्हते. पण आता रिषभ पंतनेदिल्ली कॅपिटल्स पासून वेगळे होण्याबाबत मौन सोडले आहे. त्याने एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, मी पैशासाठी हा आयपीएल संघ सोडलेला नाही. पंतने स्टार स्पोर्ट्सच्या एका व्हिडिओला रिप्लाय देत असताना आपली बाजू मांडली आहे. त्यानंतर आता एकेकाळी मिस्टर IPL अशी ओळख असलेला सुरेश रैना याने रिषभ पंतबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
"यंदाच्या लिलावात अनेक प्रतिभावान भारतीय खेळाडू लिलावात उतरणार आहेत. प्रत्येकवेळी आपण पाहतो की ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर मोठ्या पैशांची बोली लागते. मग आपल्या देशातील खेळाडूंवर मोठी बोली का लावली जात नाही. रिषभ पंतबाबत बोलायचे तर तो एक उत्तम कर्णधार आहे, स्फोटक फलंदाज आहे, प्रतिभावंत यष्टीरक्षक आहे. रिषभ पंत हा एक ब्रँड आहे, त्याची ब्रँड वॅल्यू खूप जास्त आहे. तो IPL सोबतच जाहिरातींच्या दृष्टीनेही चांगला पर्याय आहे. त्यामुळे त्याला सर्वाधिक पैसे मिळण्याची शक्यता आहे. माझ्या मते रिषभ पंतवर तब्बल २५ ते ३० कोटींची बोली लागण्याची शक्यता आहे. तेवढी बोली मिळवण्याची त्याची क्षमता आहे," अशा शब्दात मिस्टर IPL सुरेश रैनाने टीओआयशी बोलताना मत मांडले.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी रिषभ पंतने दिल्लीशी करार तुटण्याबाबत भाष्य केले. एका व्हिडिओमध्ये सुनील गावसकर म्हणाले होते की, मला विश्वास आहे की दिल्ली कॅपिटल्स आणि रिषभ पंत यांच्यात मानधनाबाबत मतभेद असू शकतात. २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मेगा लिलावात कॅपिटल्सचा संघ पंतवर बोली लावून त्याला पुन्हा संघात घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असेही गावस्कर यावेळी म्हणाले. या व्हिडिओवर पंतने प्रतिक्रिया दिली होती की, त्याने पैशासाठी दिल्ली कॅपिटल्स संघ सोडला नाही. पंतने या पोस्टमध्ये लिहिले होते की, मी निश्चितपणे म्हणू शकतो की माझे संघात रिटेन न करण्याचे कारण पैसे किंवा मानधन हे नव्हते.