इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामासाठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात होणाऱ्या लिलावात IPL मधील १० फ्रँचायझी संघ ५७४ खेळाडूंवर बोली लावताना पाहायला मिळेल. यात कुणावर सर्वाधिक भाव मिळणार? अन् कोण अनसोल्ड राहणार? याची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते.
मार्की प्लेयर १ गटात फक्त एक भारतीय जलगती गोलंदाज
यंदाच्या वर्षी होणाऱ्या IPL च्या मेगा लिलावात रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल या मंडळींवर अनेक फ्रँचायझी संघाच्या नजरा असतील. मार्की सेट १ गटात या मंडळींसह एकूण ६ खेळाडूंचा समावेश असल्याचे दिसून येते. यात फक्त एक भारतीय जलदगती गोलंदाज आहे. ज्याच्यावर पैशांची बरसात झाल्याचे पाहायला मिळू शकते. जाणून घेऊयात या गोलंदाजासंदर्भातील खास गोष्ट
'स्विंग'च्या किंगला मिळू शकतो मोठा भाव
आयपीएल मेगा लिलावाच्या मार्की प्लेयर सेट १ मध्ये जोस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह, कागिसो रबाडा आणि मिचेल स्टार्क यांच्यासह अर्शदीप सिंगचा समावेश आहे. या खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी आहे. यापेक्षा कित्येकपटीनं अधिक रक्कम मोजून या खेळाडूंवर फ्रँचायझी संघ डाव खेळण्यास तयार असतील. भारताचा युवा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगनं टी-२० क्रिकेटमध्ये आपली विशेष छाप सोडली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेत आपल्या स्विंगची जादू दाखवून देत अर्शदीप टी-२० मधील भारतीय संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय. याचा त्याला मेगा लिलालात मोठा फायदा मिळू शकतो.
तो IPL च्या मेगा लिलावात ठरू शकतो सर्वात महागडा जलदगती गोलंदाज
अर्शदीप सिंग हा विकेट टेकिंग गोलंदाज आहे. पॉवर प्लेसह डेथ ओव्हर्समध्ये संघाला विकेट मिळवून देण्यात तो चांगलाच पटाईत आहे. त्यामुळेच यंदाच्या लिलावात परदेशी गोलंदाजांपेक्षाही तो सर्वात महागडा गोलंदाज ठरू शकतो. या गोलंदाजावर २० कोटीहून अधिक मोठी बोली लागू शकते. पंजाबचा संघच त्याच्यासाठी मोठा डाव खेळणार की, तो अन्य कोणत्या संघातून खेळताना दिसणार ते पाहण्याजोगे असेल.