IPL 2025 match fixing: आयपीएल स्पर्धेदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या १८व्या हंगामात फिक्सिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा युनिटने (ACSU) लीगमधील सर्व १० संघांना आधीच इशारा दिला आहे. जर कोणी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर ताबडतोब तक्रार करा असे सांगण्यात आले आहे. ACSUच्या मते, सध्या स्पर्धेत फिक्सिंग करण्याचा प्रचंड प्रयत्न सुरु आहे. यासाठी, खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, संघ मालक आणि समालोचकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधे जात आहेत. तसेच, चाहते असल्याचे भासवून त्यांना त्यांना महागड्या भेटवस्तू देऊन आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
मास्टरमाइंड कोण आहे?
क्रिकबझच्या एका वृत्तानुसार, ACSUचा अंदाज आहे की, हैदराबादमधील एक व्यापारी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याबद्दल तपशीवार माहिती मिळालेली नाही. पण या व्यावसायिकाचे बुकींशी थेट संबंध असल्याचे निश्चितपणे समोर आले असल्याची चर्चा आहे. तो यापूर्वीही अशा कृत्यांमध्ये सहभागी होता. त्यामुळे, ACSUने IPL शी कोणत्याही प्रकारे संबंधित असलेल्या सर्वांना या संबंधात इशारा दिला आहे. जर या व्यावसायिकाने कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर ताबडतोब तक्रार करा असेही सांगण्यात आले आहे. तसेच त्याच्याशी असलेले कोणतेही संभाव्य नाते किंवा संलग्नता असल्यास आधीच उघड करा असेही सांगितले गेले आहे.
टीम हॉटेलमध्ये त्याचा वावर
मिळालेल्या अहवालानुसार, ही व्यक्ती स्वतःला चाहता सांगून खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि फ्रँचायझी मालकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला टीम हॉटेलमध्ये आणि सामन्यांमध्येही पाहिले गेले आहे असे वृत्त आहे. तो काही प्रायव्हेट पार्टीमध्ये या लोकांना बोलवतो आणि केवळ खेळाडूच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष्य करत आहे. क्रिकबझच्या मते, तो व्यक्ती चाहता म्हणवून घेत ओळख करून खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचकांच्या कुटुंबातील सदस्यांना दागिन्यांच्या दुकानांमध्ये आणि महागड्या हॉटेल्समध्ये घेऊन जाण्याची ऑफर देतो. एवढेच नाही तर त्याने सोशल मीडियाद्वारे परदेशात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला असल्याचे बोलले जात आहे.