Delhi Capitals Maria Sharapova MS Dhoni, IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स संघासाठी यंदाचा हंगामा दणक्यात सुरु आहे. ६ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह आणि ०.७४४च्या तगड्या नेट रनरेटसह दिल्लीचा संघ अव्वल आहे. यंदाच्या हंगामातील पहिली सुपर ओव्हरदेखील दिल्लीच्या सामन्यात झाली. काल, बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक पद्धतीने दिल्लीने सामन्यात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने १८८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानेही १८८ धावाच केल्या. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने प्रथम फलंदाजी करत ११ धावांवर २ गडी गमावले. प्रत्युत्तरात दिल्लीने बिनबाद १३ धावा करत सामना जिंकला. या दिल्लीच्या संघात 'मारिया शारापोवा' खेळला. तुम्ही अगदी बरोबर वाचलंत... पण या शारापोवाचा आणि लोकप्रिय टेनिसपटू मारिया शारापोवाचा काहीही संबंध नाही. याउलट याचं कनेक्शन महेंद्रसिंग धोनीशी आहे. कसं ते जाणून घेऊया.
दिल्लीकडून खेळणारा मारिया शारापोवा म्हणजे त्यांचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा. त्याचा शारापोवाशी काय संबंध आणि त्याचे हे नाव कसे पडले, त्याची एक कहाणी आहे. इएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही कहाणी सांगितली. मोहित हा मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे तो चेंडू टाकताना जोर लावतो आणि तोंडातून आवाज काढतो. हा प्रकार तसाच आहे ज्याप्रकारे मारिया शारापोवा टेनिसमध्ये शॉट खेळताना ओरडते. याच कारणामुळे धोनीने मोहित शर्माला CSK कडून खेळताना त्याला मारिया शारापोवा म्हणायला सुरुवात केली.
यंदाच्या स्पर्धेतील मोहितची कामगिरी
मोहित शर्मा यंदा सुरुवातीपासूनच दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. या फ्रँचायझीने मेगा लिलावात मोहित शर्माला २.२० कोटी रुपयांना खरेदी केले. IPL 2025 मध्ये त्याने आतापर्यंत संघाचे सर्व ६ सामने खेळले आहेत. त्याच्या गोलंदाजीत अपेक्षित धार दिसली नाही. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या पहिल्या ६ सामन्यांमध्ये मोहित शर्माला फक्त २ बळी टिपता आले. एकेकाळी तो पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असायचा, पण यावेळी तो या शर्यतीत खूप मागे आहे. येत्या काळात तो सर्वोत्तम कामगिरी करून दाखवेल असा त्याला विश्वास आहे.